आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:94 शाळांमध्ये आज मध्यावधी उपलब्धी परीक्षा

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक गुणवत्तेत कमी असल्याने जिल्ह्यात तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासणी होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांमध्ये मंगळवारी, दि. २२ नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्यांचे वाटप सोमवारी करण्यात आले. दरम्यान, परीक्षेवर लक्ष ठेवण्याकरता दिल्लीतील दोन निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

केंद्र सरकारने सन २०१७ मध्ये देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण (नॅशनल अचीवमेंट सर्वे) घेतला होता. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्याला २९९ गुण मिळाले होते. तद्नंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान समितीने शैक्षणिक उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. मार्च २०२२ मध्ये जिल्ह्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम घेतला. भरीस भर राज्य शासनाने सुद्धा २७ ऑक्टोबर २०२१ ला ‘निपुण भारत’ हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. दरम्यान, मार्च २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) मार्फत मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण अंतर्गत परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. ही परीक्षा मंगळवार, दि. २२ नोव्हेंबरला जिल्ह्यातील ९४ शाळांमध्ये होणार आहे. यात इयत्ता तिसरी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या शाळांची निवड राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केली.

चार हजार २१६ विद्यार्थ्यांचा समावेश
मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण अंतर्गत परीक्षा घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ९४ शाळांची निवड केली आहे. तिसऱ्या वर्गाच्या ४७ आणि पाचव्या वर्गाच्या ४७ शाळांचा समावेश आहे. माध्यमांमध्ये मराठी ६२, इंग्रजी २७, ऊर्दू ५, अशा मिळून ९४ शाळांचा समावेश आहे. तर तिसऱ्या वर्गातील एक हजार ७५०, तर पाचव्या वर्गातील दोन हजार ४६६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा
जिल्ह्यातून निवड केलेल्या ९४ शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी मुख्य नियंत्रक अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांची नियुक्ती केली आहे. तर प्रश्नपत्रिका शाळेत पोहोचविण्यासाठी १२३ नियंत्रण अधिकारी, आणि क्षेत्र अन्वेषक म्हणून ११२ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. परीक्षेच्या दृष्टीने कार्यशाळा घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...