आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील काही मोजक्याच उद्योगपतींच्या हितासाठी कृषी कायदा करून देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न फसल्यावर आता देशप्रेमासाठी सैन्यात जाऊन आपले प्राण देशासाठी अर्पण करण्याची जिद्द बाळगणाऱ्या कोट्यवधी तरुणांना संपवण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा दिसत आहे. त्यामुळे देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी केला.
मोदी सरकारने जाहीर केलेले ‘अग्निपथ अभियान मुळे सैन्य दलात जाण्याची तयारी करीत असलेल्या लाखो तरुणांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे. केवळ चार वर्षे काम व नंतर आयुष्यभराची बेकारी त्याच्या वाट्याला येणार आहे. या योजनेला प्रचंड विरोध झाल्यावर २५ टक्के तरुणांना सैन्य दलात प्रवेश देण्यात येईल असे घाईघाईने जाहीर करण्यात आले. पण उरलेल्या ७५ टक्के तरुणांचे काय. काही लाख रुपये त्यांना मिळणार असले तरी त्यांना नोकरीची काहीच खात्री नाही. त्यामुळे आज तरुण रस्त्यावर दिसत आहे. कृषि कायदा शेतकऱ्याच्या विरोधात असल्याचे आढळून आल्यावर लाखो शेतकरी रस्त्यावर आले. शेकडो शेतकऱ्यांचा बळी या आंदोलनात गेला तेव्हा मोदी यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागून कृषी कायदा मागे घेतला.
आज अग्निपथ योजना जाहीर झाल्यावर तरुण पेटून उठला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यावर त्यांना सैन्यदलाची दारे कायम बंद होऊ शकतात त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊ शकतात अशी भीती मोघे यांनी व्यक्त केली आहे. मोदी सरकारने नोट बंदीचा प्रयोग केला. त्यात देशाचे प्रचंड नुकसान झाले काळा पैसा आला नाही व प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख जमा झाले नाही. त्यानंतर कृषी कायदा केला. प्रचंड विरोध झाल्यावर मागे घेण्यात आला. आता अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली. मात्र आता या योजनेला होत असलेला विरोध पाहता केंद्र सरकारने ही योजना तात्काळ मागे घ्यावी असे मोघे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.