आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान अंदाज:चार दिवसांनी होणार मान्सून सक्रिय; पेरणीसाठी शेतकऱ्यांची दिसतेय लगबग

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. अशात मान्सूनची एन्ट्री सुद्धा झाली आहे. पेरण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये पहावयास मिळत आहे. मात्र, आणखी चार दिवस जिल्ह्यात सर्वदुर मान्सून सक्रीय होणार नाही. अशा परिस्थितीत ७५ मी मी पावसानंतरच शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

मृगनक्षत्र लागून दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरीसुद्धा मान्सून पाहिजे त्या गतीने जिल्ह्यात सक्रीय झालाच नाही. मागिल दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. वीज पडून काही जणांना स्वत:चा जीव गमावण्याची पाळी आली आहे. अवकाळी पाऊस पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या लागवडीची तयारी चालू केली होती. बी-बियाणे, खते शेतकऱ्यांनी खरेदी केले. त्यामुळे पेरण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात बुधवार, दि. १५ जून राजी काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती.

यात प्रामुख्याने दारव्हा, नेर, पुसद, उमरखेड, वणी, झरीजामणी, केळापूर, घाटंजी आणि राळेगाव तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यात ६.७ मी मी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर मृग नक्षत्र लागल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात ३१.७ मी मी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वातावरणात आता अमुलाग्र बदल जाणवत आहे. प्रत्यक्षात मात्र, अद्यापही मान्सून जिल्ह्यात सक्रीय झाला नाही. उन्हाची तीव्रता आणखी मोठ्या प्रमाणात आहे. सर्वदुर पाऊस पडला नसल्यामुळे पेरण्या उलटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात साधारणत: ७५ मी मी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाच्या उघडीपमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे.

चार कंपन्यांचे बियाणे तपासणीत नापास
पेरणीपूर्व काही कंपन्यांचे कापूस बियाणे तपासणी करीता नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यात चार नमुने निकृष्ट असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. चार कंपन्यांचे नमुने रद्द ठरले असून, त्या बियाणे उत्पादक कंपन्यांना कृषी विभागाने विक्री बंदीचे आदेश दिले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून ठेवल्याची शक्यता आहे. त्या शेतकऱ्यांना आर्थीक फटका बसू शकतो. याकरीता कृषी विभागाला आतापासूनच पावले उचलावे लागणार आहे.

पेरणीची जोखीम आतापासूनच घेऊ नये
अद्यापही सर्वदुर पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मौसमी वाऱ्याची खात्री करावी, वनशक्ती तपासणी करावी, बीज प्रक्रीया, ७५ मी मी पेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची जोखीम घेऊ नये. येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून सक्रीय होईल.
प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...