आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातोडा:अतिक्रमणावर पालिकेचा पुन्हा हातोडा

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली पालिकेची अतिक्रमण मोहीम सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यात सिव्हील लाइन परिसरात असलेल्या अतिक्रमणांवर पालिकेने हातोडा चालवला. दुपारनंतर मात्र ही मोहीम आर्णी मार्गाने पुन्हा मार्गस्थ झाली. पालिकेची अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरू झाल्याचे कळताच अतिक्रमणधारकांची भंबेरी उडाली होती.

मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या वतीने पोलिस बंदोबस्तात शहरात ही कार्यवाही केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात यवतमाळ नगर परिषदेने तहसील चौक, पोलिस स्टेशन ते बसस्थानक परिसर, नेताजी मार्केट, दत्त चौक, आर्णी रोड या परिसरातील शेकडो अतिक्रमणांवर कारवाईचा बुलडोझर फिरवला. दरम्यान शहरातील इतर भागातल्या व्यावसायिकांनी आपली बेकायदेशीर अतिक्रमणे स्वहस्ते काढावीत व स्वतःचे नुकसान टाळावे याबाबत पालिका प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊन सातत्याने आवाहन केले. तथापी अतिक्रमणधारकांनी आवाहनाची गंभीरपणे दखल घेतली नाही. परिणामी अतिक्रमण निर्मूलनासाठी प्रशासनाला कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त होते.

शहरातील खवैय्या गल्ली, समता मैदान-पोष्टल ग्राउंड सुरक्षाभिंत, पुनम चौक ते रानडे हॉस्पिटल रस्ता, न्यायालय परिसर आणि संविधान चौक ते आर्णी रोड परिसरातील रस्त्या लगतची सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली. सकाळी १० पासून चोख पोलिस बंदोबस्तात सुरु झालेली ही कारवाई दिवसभर सुरू होती. पालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागासह आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक, पालिकेचे क्षेत्रीय विभाग प्रमुख आणि शेकडो कर्मचाऱ्यांचा ताफा या कार्यवाहीत सहभागी झाला होता. या मोहिमेत होणारे नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण धारकांनी वेळीच आपले अतिक्रमण काढावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांची गैरहजेरी
पोस्टल मैदानात शेजारी असलेल्या खाऊ गल्लीमध्ये व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचे पथक गेले होते. मात्र ही दुकाने जिल्हा क्रीडा विभागाच्या अंतर्गत येत असल्याने त्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी असणे अपेक्षित होते. सकाळी १० वाजता मोहिम असताना दुपारी १२ वाजेपर्यंत त्या ठिकाणी कुणीच हजर नसल्याने मुख्याधिकारी यांनी त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...