आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बॅनर संदर्भात पालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या शासकीय मालमत्तांवर लावण्यात येणारे बॅनर काढुन टाकण्यात येत आहेत. या कारवाईमुळे शहरातील बॅनरबाजीला काही प्रमाणात का होइना लगाम लागण्याची शक्यता आहे.
गेल्या चार-पाच वर्षात शहरात बॅनर लावण्याचे फॅड वाढले आहे. कुठलाही कार्यक्रम असो की कुणाचा वाढदिवस बॅनर लावुन तो साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहेत. पुर्वी केवळ राजकीय नेते, पुढारी यांच्या दौऱ्यादरम्यान किंवा वाढदिवसाला बॅनर लागलेले दिसायचे मात्र आता तर गल्ली बोळात राहणारे तरुण आपल्या मित्राचा वाढदिवसही दोन-चार बॅनर लावुन साजरा करतात. हे बॅनर सर्वांच्या निदर्शनात यावे यासाठी ते शहरातील मुख्य मार्गावर सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी लावण्यात येतात. त्यासाठी रस्ता दुभाजकामध्ये लावण्यात आलेले पथदिवे सर्वात सोपे वाटतात. त्यामुळे या पथदिव्यांवर बॅनर लावण्यात येतात. त्या बॅनरची संख्या इतकी जास्त असते की, त्याचा त्रास नागरिकांना व्हायला लागतो. इतकेच नव्हे तर मुख्य मार्गावर जागोजागी लावण्यात येणारे हे बॅनर शहराचे सौदर्य विद्रुप करण्याचे काम करीत आहेत.
नेमक्या याच बाबीची दखल घेत पालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी गेल्या काही महिन्यांपासून शहरातील मुख्य मार्ग बॅनर मुक्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी एका विशेष पथकाची निर्मीती करण्यात आली असुन त्यांच्याकडून सातत्याने बॅनर काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुख्य मार्गावर असलेल्या शासकीय मालमत्ता जसे पथदीवे, रस्त्यावरील रेलिंग यासारख्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढुन टाकण्यात येत आहेत. त्यामुळे शहर विद्रुप करण्यासाठी कारणीभुत ठरत असलेल्या बॅनरबाजीवर काही प्रमाणात का होइना आळा बसला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.