आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये बोगस डॉक्टरांचे जाळे पसरले असून नागरिकांच्या जिवाशी या बोगस डॉक्टरांचा खेळ सुरु आहे. सर्वच आजारावर हे डॉक्टर रुग्णांना औषधी देत असल्याचे चित्र ग्रामीण भागात असून याविषयी आरोग्य विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
आता कडक उन्हाळा सुरू झाला असून सकाळी ९ वाजताच उष्णतेच्या झळा नागरिकांना बसत आहेत. या वाढत्या उष्णतेमुळे अनेक आजार वाढल्याचे चित्र आहे. तसेच साथीचे आजार बळावण्याचा धोकाही आहे. अशातच हे डॉक्टर सर्वच आजारांवर इलाज करताना दिसून येते. कळंब तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे.
ग्रामीण भागातील गरीब तसेच अशिक्षित नागरिकांना हे डॉक्टर भूलथापा देत त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा बील उकळत त्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अल्प प्रमाणात असल्याने तांडा, वाड्यावरील तसेच पोड आणि अंतर्गत गावातील लोकांचे आरोग्य चांगले असावे या दृष्टीने नागरिकांना या डॉक्टरांकडे जावे लागते.
बोगस डॉक्टरांची शोध मोहिम जिल्हा आरोग्य विभागाने राबवणे गरजेचे आहे. बोगस डॉक्टरांविरुद्ध मोहिम राबवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे पथक असून अजूनपर्यंत किती बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई केली ही माहिती नाही. परिणामी बोगस डॉक्टरांनी आपले प्रस्थान सध्या ग्रामीण भागाकडे वळल्याचे पहावयास मिळते. प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील रुग्ण या डॉक्टरांकडे वळत आहे. ग्रामीण भागातील अनेक गावात आरोग्य यंत्रणा म्हणावी तशी अजूनही पोहोचली नाही.
कुठल्याही प्रकारचा आजार दिसून आल्यास रुग्णालयात जाण्याऐवजी बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेणे सुरू आहे. या प्रकारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. यांच्याकडे गेल्यास असाध्य असलेल्या रोगावर सुद्धा इलाज करण्याची हमी या डॉक्टरकडून दिल्या जाते. बोगस डॉक्टरांविरुद्ध तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.