आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:२४ तासांमध्ये कोरोनाचे नऊ बळी, ११ वर्षीय मुलीच्या मृत्युने खळबळ

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ५२६ नवे पॉझिटिव्ह, ३१४ जण झाले कोरोनामुक्त

गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सर्वांत महत्वाचे म्हणजे यवतमाळ येथील चक्क ११ वर्षीय मुलीच्या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे. शुक्रवारी १९ मार्च रोजी ५२६ जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर ३१४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात कोरोनाने मार्च महिन्यात मृत्यूचा आकडा सुद्धा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वच वयोगटातील पुरूष आणि महिलांचा आकडा आहे. या प्रकारामुळे प्रशासनाची चिंता कमालीची वाढली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा सुद्धा दिवसागणिक वाढत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय असो अथवा सीसीसी सेंटर सुद्धा हाऊसफुल्ल झाले आहे. लक्षणे नसलेल्यांना आता होमकॉरेन्टाईन केल्या जात आहे. असे असताना शुक्रवार, दि. १९ मार्च रोजी तब्बल ९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ५४० मृत्यूची नोंद झाली आहे. मृत झालेल्या ९ व्यक्तींमध्ये यवतमाळ येथील ७२ वर्षीय पुरुष आणि ७०, ४८, ११ वर्षीय महिला, दिग्रस शहरातील ४१ वर्षीय पुरुष, तर तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ५५ वर्षीय महिला, पांढरकवडा येथील ५२ वर्षीय महिला, माहूर (जि.नांदेड) येथील ५५ वर्षीय महिला आदींचा समावेश आहे.

शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या ५२६ जणांमध्ये ३७५ पुरुष आणि १५१ महिला आहेत. यात यवतमाळातील २४९, पुसद ८१, दिग्रस ९७, उमरखेड २४, महागाव २२, नेर २०, मारेगाव ११, कळंब ७, पांढरकवडा ३, घाटंजी ३, बाभुळगाव २, दारव्हा २, वणी २, झरीजामणी २ आणि आर्णी येथील ऐ रुग्ण आहे. एकूण पाच हजार ३९ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी चार हजार ५१३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन हजार २४४ ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ हजार ७४० झाली आहे. गेल्या २४ तासात ३१४ जण कोरानामुक्त झाले असून, जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २० हजार ९५६ आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत दोन लाख २० हजार ९५८ नमुने पाठविले असून, यापैकी दोन लाख १० हजार ८०९ प्राप्त, तर १० हजार १४९ अप्राप्त आहेत.

प्रमाणपत्र नसल्याने १३ प्रतिष्ठाने केली सील
दिग्रस|कोरोची चाचणी न करणाऱ्या शहरातील १३ प्रतिष्ठानांना शुक्रवार, दि. १९ मार्च रोजी सील करण्यात आले आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह असलेले ५ व्यक्ती शहरात वावरतांना आढळून त्यांच्यावर सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १८८ अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई तहसीलदार राजेश वझिरे, मुख्याधिकारी शेषराव टाले, पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी केली. त्या १३ व्यावसायिकांजवळ रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र नव्हते.

कुटूंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह, तरी दुकान उघडे
सध्या जिल्हा प्रशासनाने संपूर्ण व्यावसायिकांना कोविड-१९ ची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने चाचण्या करण्यास सुरूवात झाली आहे. असे असताना बहुतांश जण निगेटिव्ह आले आहेत, परंतू काही जणांच्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून येत आहे. अशा व्यक्तीचा परिसर सील करणे बंधनकारक आहे. मात्र, पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेल्यांच्या घरातील इतर व्यक्ती प्रतिष्ठाणे उघडणार नाही, याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.

खासगी कोचिंग क्लासेसला परवानगी
दहावी, बारावीच्या परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण, शहरी विभागातील खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, इतर प्रशिक्षण संस्था अटींच्या अधीन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात आसन क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २० विद्यार्थी राहतील. तसेच दोन बॅचमध्ये अर्ध्या तासाचा अवकाश ठेवून प्रत्येक वेळी हॉल, रुमचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षण देणाऱ्या आस्थापनेतील सर्व संबंधितांचे तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करणे हे अनिवार्य राहील.

बातम्या आणखी आहेत...