आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षक:जिल्हा क्रीडा संकुलातील प्रशिक्षकांना बजावणार नोटीस ; लवकरच समितीची बैठक

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र या सुविधांचा वापर काही प्रशिक्षक फुकटात करीत आहे. इतकेच नव्हे तर फुकटात वापरण्यात येणाऱ्या मैदानांवर खेळाडूंना प्रशिक्षण देवुन त्यांच्याकडून प्रशिक्षणाचे पैसेही घेत आहेत. यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने सविस्तर वृत्त प्रकाशीत करुन या गंभीर बाबीकडे क्रीडा विभागाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत कुठलाही मोबदला न देता क्रीडा संकुलाचा वापर करणाऱ्या सर्व प्रशिक्षकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. शहरातील गोधनी मार्गावर असलेल्या जवाहरलाल नेहरु जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या विविध क्रीडा प्रकाराच्या अद्ययावत मैदानांचा उपयोग खेळाडूंना व्हावा आणि त्या मैदानांची देखभाल दुरुस्ती योग्य पद्धतीने व्हावी यासाठी सर्व मैदाने भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी देण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात एक मैदान, एक व्यायामशाळा आणि जलतरण तलाव केवळ या तीनच बाबी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. असे असताना क्रीडा संकुलात असलेल्या सर्व मैदानांचा आणि इतर सोई सुविधांचा वापर कुठलाही मोबदला न भरता सर्रास करण्यात येत आहे. त्यातही या ठिकाणी काही प्रशिक्षकांनी क्रीडा मैदानांवर प्रशिक्षण सुरू केले असुन त्यासाठी खेळाडुंकडुन पैसे घेण्यात येतात. मात्र त्या पैशांपैकी कुठलाही निधी जिल्हा क्रीडा संकुल देखरेख समितीकडे देण्यात येत नाही. या संदर्भात खेळाडुंच्या पालकांकडुनही मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. या संपुर्ण प्रकरणासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने वृत्त प्रकाशीत केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कुठल्याही मोबदल्या शीवाय मैदानांचा वापर करणाऱ्या प्रशिक्षकांना थेट नोटीस बजावुन कारणे विचारणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंदर्भात माहिती देऊन या प्रकरणात ठोस निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन मागण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...