आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:अमरावतीच्या कुख्यात गुटखा तस्कराला नागपुरातून अटक

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाभुळगाव शहरातील लाखो रुपयांच्या गुटखा प्रकरणात एलसीबीने विदर्भातील गुटखा तस्कराला ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी करण्यात आली. विक्रम उर्फ विक्की मंगलानी रा. अमरावती असे त्या तस्कराचे नाव आहे.

एलसीबी पथकाने बाभुळगाव येथे साठवणूक करण्यात आलेल्या गुटखा गोदामावर धाड टाकत तब्बल ९८ लाख ३१ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अहेफज मेमन याला अटक करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी हा गुन्हा एलसीबीकडे वर्ग केला.

एलसीबी पथकाने अहेफज मेमन याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर एलसीबी पथकाने यातील सराईत गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसून अहेफज याची चौकशी सुरू केली. यावेळी अहेफज याला प्रतिबंधित गुटख्याचा माल अमरावती येथील व्यापारी विक्रम उर्फ विक्की मंगलानी याने पुरवल्याची कबूली दिली. त्यावरून विक्रम उर्फ विक्की मंगलानी याच्या शोधात एलसीबीचे दोन पथक तैनात करण्यात आले. या पथकांनी अमरावती, पुणे आणि नागपूर येथे शोधमोहीम राबविली.

दरम्यान नागपूर विमानतळ परिसरातून सोनेगाव पोलिसांच्या मदतीने एलसीबीने ताब्यात घेतले. रविवारी विक्रम उर्फ विक्की मंगलानी याला एलसीबी पथकाने न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विक्रम मंगलानी हा माल कुठून आणत होता, जिल्ह्यात कोणा-कोणाला पुरवठा करीत होता, याबाबतची माहिती एलसीबीकडून घेण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वनारे, अमोल मुंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...