आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह आढळून आला:अनैतिक संबंधात अडसर; प्राध्यापक पतीची हत्या

दिग्रस4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसापूर्वी तालुक्यातील सिंगद येथील पुलाखाली प्रा. सचिन देशमुख याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी कुटुंबीयांनी सचिन याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनानंतर अज्ञात मारेकऱ्यांवर खूनाचा गुन्हा नोंदवून शोध सुरू केला होता. अश्यात गुरुवारी पोलिसांनी सचिन याची पत्नीला ताब्यात घेतले असून पती आणि तिच्या प्रियकराने मिळून सचिन याची हत्या केल्याचे समोर आले आहे. धनश्री देशमुख असे मृत सचिन याच्या पत्नीचे नाव असून शिवम बछले असे तिच्या प्रियकराचे नाव आहे.

दिग्रस-पुसद मार्गावर असलेल्या सिंगद येथील पुलाखाली सोमवारी सायंकाळी एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या हातावर सचिन नाव गोंदलेले होते. पोलिसांच्या अवाहनानंतर तो मृतदेह उमरखेड येथील सचिन देशमुख याचा असल्याचे उघडकीस आले. सचिन हा त्याच्या पत्नीकडे अकोट येथे गेला होता, त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह सिंगद येथील पुलाखाली आढळून आला.

पोलिसांना या मृतदेहाबाबत संशय येत असल्याने त्यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह यवतमाळ येथे पाठविला. त्यानंतर दिग्रस पोलिसांना प्राप्त वैद्यकीय अहवालात संशयित बाबी आढळून आल्याने दिग्रस पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास घट्टे, उपनिरीक्षक विशाल बोरकर, सुजित जाधव करीत आहे. अकोट येथून पत्नीला भेटून निघाल्यानंतर सचिन याचा मृतदेह सिंगद येथे कसा आला, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.

त्यामूळे पोलिसांनी अधिक खोलवर तपास सुरू केला असता, अनैतिक संबंधातून गळा आवळून खुन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, ठाणेदार धर्मा सोनुने यांच्यासह एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप परदेसी, सायबर विभाग व उमरखेड पोलिसांनी सखोल चौकशी केली. या प्राथमिक चौकशीत मृताची पत्नी धनश्री देशमुख व तिचा प्रियकर शिवम बछले यांच्या सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. धनश्री देशमुख ही अकोट येथे वनरक्षक होती तर तिचा प्रियकर शिवम बछले परतवाडा येथे वनरक्षक होता. तर पती सचिन देशमुख हा प्राध्यापक होता.

बातम्या आणखी आहेत...