आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दोनशेहून अधिक दिव्यांगाची ऑनलाईन नोंद

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दिव्यांग उन्नती पोर्टलचा नुकताच शुभारंभ झाला. या पोर्टलवर आतापर्यंत २११ दिव्यांगांनी नोंदणी केली आहे. विविध प्रकारच्या दिव्यांगांनी ह्यात नोंदणी केली असून, अधिकृतरित्या नोंदणी झाल्याने अपंग कल्याण विभागाच्या आणि इतरही योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल.जिल्हा परिषद अपंग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगासाठी विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात येतात.

या योजनांसाठी जिल्हा परिषद सेस फंडातून निधीचे नियोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे पंचायत समिती, ग्राम पंचायत यांच्या मार्फत सुद्धा निधी प्रस्तावित करण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थींना रितसर अर्ज करावा लागतो, परंतू बऱ्याच वेळा लाभार्थींची निवड करताना प्रशासनासमोर अडचणी निर्माण होतात. खरे लाभार्थी वंचित सुद्धा राहतात.

हा प्रकार थांबावा, ह्याकरीता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उन्नती पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने जागतिक दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग उन्नती पोर्टलचे उद्घाटन आणि निमित्त महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल दिव्यांग सहाय्य कक्षाचे लोकार्पण पार पडले. या पोर्टलवर आता दिव्यांगांच्या नोंदणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जिल्हाभरातील विविध प्रकारांनी दिव्यांग असलेल्या २११ जणांची पोर्टल वर नोंदणी झाली आहे.

यात प्रामुख्याने झरी जामणी आणि केळापूर तालुका आघाडीवर आहे. झरी तालुक्यात १६७, केळापूर ३७, राळेगाव ४, यवतमाळ, कळंब, आर्णी ह्या तालुक्यात प्रत्येकी एक ह्या प्रमाणे दिव्यांगांनी नोंदणी झाली आहे. उर्वरीत तालुक्यात अद्याप पर्यंत एकाही दिव्यांगाची नोंदणी झाली नाही. येत्या काळात जिल्हाभरातील सर्वच दिव्यांगाची नोंदणी होईल.

संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे
जिल्ह्यात दिव्यांगाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश दिव्यांग स्वत: कष्ठ, परिश्रम करून उदरनिर्वाह करतात. अशा लाभार्थीला शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे अपेक्षीत आहे. यासाठी विविध संघटना वेळोवेळी प्रशासनाला निवेदन, धरणे आंदोलन करतात. आता उन्नती पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...