आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामृग नक्षत्र लागून जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, १० टक्के क्षेत्रावर आतापर्यंत खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या असून, बहुतांश शेतकऱ्यांचे लक्ष सध्या पावसाकडे लागले आहे. यात सर्वाधिक ८५ हजार ८३६ हेक्टरवर कापसाचा पेरा आहे.
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता मृग नक्षत्र लागूनही १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. अद्यापही जिल्ह्यात सर्वदुर मान्सून सक्रीय झालाच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हाभरातील सोळा ही तालुक्यात अधून मधून विजांच्या कडकडाटासह वादळी वारा, पावसाने हजेरी लावली आहे. वीज पडून अनेकांना जीव गमवावा लागला. मात्र, मान्सूनची एन्ट्री विलंबाने झाल्याचे स्पष्ट दिसून आले. विशेष म्हणजे मान्सून जिल्हाभरात सक्रीय होण्यास बराच कालावधी लोटल्या गेला आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस कुठेही झालाच नाही.
अशा परिस्थितीत ७५ मी मी पेक्षा अधिक पाऊस पडणार नाही, तो पर्यंत पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागासह विभागीय कृषी संशोधन केंद्राने केले होते. या आवाहनाला बहुतांश शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात ९ लाख दोन हजार ७० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड अपेक्षीत आहे. अशात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरूवात केली. आतापर्यंत एक लाख तीन हजार १७२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यात ८५ हजार ८३६ हेक्टरवर कापूस, ७ हजार ३५२ हेक्टरवर सोयाबीन, तर तूर, मुग, उडीद मिळून ९ हजार ९७८ हेक्टरचा समावेश आहे. आणखी पेरणी योग्य पाऊस झालाच नाही. दरवर्षी जून अखेरपर्यंत ७० टक्क्याहून अधिक क्षेत्रावर पेरण्या होतात. आता शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.
आतापर्यंत ५१ मी मी पावसाची नोंद : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५१.३ मी मी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक ९८.१ मी मी पाऊस महागाव तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ दिग्रस ७५, पुसद ६७.१, राळेगाव ५७.२, घाटंजी ५२.९, दारव्हा ५१.२, कळंब ४९.८, केळापूर ४८.६, झरीजामणी ४६.७, वणी ४५, बाभूळगाव ४२.८, उमरखेड ४२.४, नेर ४०.४, यवतमाळ ३९.५, मारेगाव ३५. ३, आर्णी २८.२, असे मिळून ५१.३ मी मी पावसाची नोंद आहे.
तूर, मुगाची ९ हजार ९७८ हेक्टरवर लागवड
जिल्ह्यात तूर, मुग, उडीद आदी कडधान्य लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यात तूर ८ हजार ९९१, मूग ९८६, तर एक हेक्टरवर उडीद, असे मिळून ९ हजार ९९७८ हेक्टरवर कडधान्याची लागवड झाली आहे. विशेष म्हणजे नेर तालुक्यात सहा हेक्टरवर ऊस लागवडसुद्धा झाली आहे.
सोमवारी पहाटे कोसळला पाऊस
पावसाची प्रतीक्षा लागलेली असताना सोमवार, दि. २० जून रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली आहे. तद्नंतर दुपारी १२ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते, परंतू दुपारनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा दिसून आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.