आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:देशी दारू दुकान बंद करण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधक आक्रमक; नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महागाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव शहरात नव्यानेच सुरू झालेले दारूचे दुकान बंद करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना, भाजप व विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

पुसद तालुक्यातील परवाना असलेले देशी दारूचे दुकान महागाव शहरातील प्रभाग क्र.१७ मध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले. मात्र आता हे दुकान बंद करण्यासाठी महागाव नगर पंचायतच्या सत्ताधारी गटासह विरोधकांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी सदर दुकान शहरात चालू करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. परंतू जनविरोध पाहता हे दुकान चालू झाले नाही. आता नगर पंचायतमध्ये सत्तापरिवर्तन झाले आहे. त्यामुळे अगोदरच या दुकानाच्या विरोधात असलेली शिवसेना, भाजप सत्तारूढ झाली. त्यामुळे हे दुकान बंद करण्यासाठी आक्रमक झाले तर मागील पंचवार्षिकमध्ये सत्तेत असलेले काँग्रेस हे दुकान सुरू होण्याच्या बाजूने होते. परंतू आजमितीला या दारू दुकानाला वाढता जनविरोध पाहता त्यांनी सुद्धा या दारू दुकानाला विरोध सुरू केला आहे.

हे दुकान सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महागाव शहरातील एका राजकीय व्यक्तीने मदत केल्याची चर्चा शहरात सुरू असून, एरव्ही शहरात कोणतीही घटना घडण्याच्या अगोदरच नगर पंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांना त्याची कुणकुण लागते. मात्र जनतेचा विरोध असताना सुद्धा पुसद तालुक्यातील दारूचे दुकान थेट महागाव शहरातील एका प्रभागात चालू झाले, याची तिळमात्र माहिती त्यांना नसणे हे मात्र न उलगडणारे कोडेच आहे.

संपूर्ण तपासणीनंतरच परवानगी
सदर दुकान एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. दुकानदाराने दाखल केलेल्या कागदपत्रे यांची छाननी व सर्व तपासण्या केल्यानंतरच दुकान सुरू करण्यासाठी आयुक्तांनी परवानगी दिली.
- सुरेंद्र मनपीया, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यवतमाळ.

शहर दारूमुक्त करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करू
महागाव नगर पंचायतीच्या स्थापनेनंतर २७ नोव्हेंबर २०१५ ला परिवर्तन विकास आघाडीचा पहिला नगराध्यक्ष झाला. त्यानंतर काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला. परंतु सदर नगराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश घेतला व सत्ता कायम ठेवली. आजही शिवसेनेचीच सत्ता असून कोणत्याही स्वरूपाची एनओसी देण्याचा अधिकार नगराध्यक्षांना आहे. तसेच महागाव शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यांचीच दारूची दुकाने असून, त्यांनीच हे देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी दुकानदाराला मदत केली. महागाव शहर दारूमुक्त करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार.
- शैलेश कोपरकर, गटनेता काँग्रेस न. पं. महागाव.

दुकान कायमचे बंद करण्यासाठी तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करणार
शहरातील प्रभाग क्र. १७ मध्ये देशी दारूचे दुकान थाटणारा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधील अपक्ष उमेदवाराच्या निवडणुकीच्या कामकाजात दिवसरात्र मेहनत घेत होता हे शहरातील सर्व नागरिकांनी पाहिले आहे. या उमेदवाराचे पुत्र तत्कालीन उपनगराध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनीच प्रभाग क्र. १७ मधे हे दारूचे दुकान उभे करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली असल्याची चर्चा आहे. हे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करणार.
-प्रमोद भरवाडे, तालुकाप्रमुख शिवसेना महागाव.

बातम्या आणखी आहेत...