आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणकेश्वर येथील घटना:घरासमोर डफडे वाजवण्यास विरोध, झटापटीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

उमरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळशीचे लग्न सुरू असतांना डफडे वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या झटापटीत एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना उमरखेड तालुक्यातील माणकेश्वर येथे शनिवार, दि. ५ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. बाबाराव मोतीराम पतंगे वय २७ वर्ष रा. माणकेश्वर असे मृत तरूणाचे नाव आहे. झटापटीतून बाबाराव यांच्या गुप्तांगावर लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप वडील मोतीराम पतंगे यांनी केला आहे.

उमरखेड तालुक्यातील माणकेश्वर येथील मोतीराम पतंगे यांच्या घरी शनिवारी सायंकाळी तुळशीचे लग्न सुरू होते. यावेळी गावातील लक्ष्मण गाजुलवार हा मद्य प्राशन करून पतंगे यांच्या घरासमोर येवून डफडे वाजवत होता. यावेळी बाबाराव पतंगे या तरुणाने लक्ष्मण याला डफडे वाजवू नको, म्हणून सांगितले. दरम्यान लक्ष्मण याने शिविगाळ सुरू केल्याने दोघांमध्ये झटपट झाली. यात बाबाराव पतंगे हा जखमी झाल्याने कुटुंबीयांनी त्याला उमरखेड येथील शासकीय रुग्णालय दाखल केले. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी तपासणी दरम्यान बाबाराव पतंगे याला मृत घोषित केले.

त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीत काहीच आढळून न आल्याने पोलिसांनी मृत तरुणाच्या उत्तरीय तपासणीने नमुने अमरावती येथे पाठविले असून एफएसएल अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा उमरखेड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा प्राथमिक तपास बिटरगाव ठाणेदार प्रताप घोस यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विनीत घाटोळ, अंकुश शेळके, रमेश दगडगावकर करीत आहे. मृत तरुणाच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी व एक वर्षाची मुलगी आहे. या घटनेमुळे माणकेश्वर गावात शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...