आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑर्डर:तब्बल पाच महिने दडवल्या नऊ अंशकालीन परिचरांच्या ऑर्डर

अमोल शिंदे । यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या (पार्ट टाईम अटेन्डन्ट) ऑर्डरवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जून महिन्यात स्वाक्षरी केली होती. तद्नंतर तब्बल पाच महिने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी ती ऑर्डर दडवली होती. शेवटी १८ नोव्हेंबर रोजी ९ महिलांच्या नियुक्तीची ऑर्डर काढण्यात आली. नेमकी कुठल्या कारणाने ऑर्डर दडवण्यात आली, ह्या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी केल्या जात आहे.

जिल्ह्यात ६६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ४३५ आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित आहे. मात्र, रिक्त पदामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र नावापुरतेच असल्याचे स्पष्ट दिसून येते. यावर उपाय योजना म्हणून विविध प्रकारे कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास परवानगी देण्यात येते, परंतू कंत्राटी पदभरतीतील ऑर्डर विहित मुदतीत दिल्या जात नसल्याचे बऱ्याच वेळा समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार जिल्हा परिषद आरोग्य विभागात घडला आहे. आरोग्य विभागाने जून महिन्यात डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे फाईल टाकली होती. तद्नंतर त्यांनी त्या फाइलवर स्वाक्षरी करून ९ अंशकालीन स्त्री परिचरांच्या ११ महिन्याची ऑर्डर निर्गमित केली होती.

पाच महिने उशिरा मिळाली ऑर्डर
ग्रामपंचायतचा ठराव घेऊन उपकेंद्रामधील एएनएमच्या माध्यमातून आरोग्य विभागात प्रस्ताव दाखल केला होता. तद्नंतर आरोग्य विभागात पाठपुरावा केला, परंतू अद्यापही ऑर्डर झालीच नसल्याचे सांगण्यात येत होते. आता नियुक्ती ऑर्डर काढण्यात आली. मात्र, पाच महिने उशिराने ऑर्डर मिळाल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एक अंशकालीन स्त्री परिचर महिलेने दिली.

प्रकरणाची चौकशी केल्या जाईल
अंशकालीन स्त्री परिचराच्या फाइलवर स्वाक्षरी करून बराच कालावधी लोटला आहे. मात्र, एव्हढ्या उशीरापर्यंत ऑर्डर कुठल्या कारणाने थांबवली हे कळू शकले नाही. ह्यात कार्यालयीन अडवणूक झाली की काय हे तपासणे गरजेचे आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन चौकशी केल्या जाईल. चौकशीत दोषी आढळून येणाऱ्यांवर कारवाई केल्या जाईल.डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी,

बातम्या आणखी आहेत...