आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश:कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शंभरी पार, अखेर वाटखेड(बु.)प्रतिबंधित क्षेत्र घोषित

बाभूळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाभूळगाव तालुक्यातील वाटखेड बु.येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्याच्या घरी आशा स्वरूपात पाटी लावण्यात आली आहे

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील वाटखेड (बु.) गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संबंधीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बुधवार, दि. १७ रोजी काढले असून, पुढील १५ दिवस वाटखेड (बु.) गाव हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात क्लस्टर कंटेंनमेंट प्लॅननुसार कार्यवाही करण्यात येईल. सद्यस्थितीत वाटखेड (बु.) गावात १०८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे. तालुक्यातील वाटखेड (बू.) येथील कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा शंभरी पार गेली आहे. अशात बाभूळगाव कोव्हीड-१९ सेंटरची क्षमता अत्यल्प आहे. त्यामुळे कोव्हीड-१९ बाधित रुग्णांना त्यांच्या घरीच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गृहविलगीकरणामध्ये ठेवण्याबाबतचे आदेश यवतमाळ उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी१७ मार्च रोजी आदेश काढून वाटखेड (बु.) हे गाव १५ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

त्यामुळे गावामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कुणालाही जाण्यास मनाई राहणार आहे. सदर मनाई हुकूम आदेशाचे कालावधीत पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस निर्गमित कराव्या आणि संबंधित परवाना, पासेसधारकांची यादी पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांना तत्काळ द्यावी. तसेच इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांमार्फत करावी, असेही आदेशात नमुद केले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या २१ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आदेशान्वये प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेले नियम वाटखेड (बू.) या प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८, इतर संबधित कायदे, नियम यांचे अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाकडून आदेशित करण्यात आले आहे.

आता ग्रामस्थांनी काळजी घेणे गरजेचे : गेल्या काही दिवसांपासून गावात रुग्णांची वाढलेली संख्या अतिशय चिंताजनक आहे. या प्रकारामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहे. प्रशासन नियमित पावले उचलत आहे. तरीसुद्धा ग्रामस्थांनी काळजी घेणे आता अत्यावश्यक झाले आहे.

गणगाव येथील काही भाग प्रतिबंधित घोषित
आर्णी|तालुक्यातील मौजा गणगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने सदर रुग्णाच्या घराच्या परिसरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आर्णी तालुक्यातील मौजा गणगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या घराच्या परिसरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून, सदर भागाच्या सीमा पुढील आदेशापर्यत बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...