आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रुग्णालयांमध्ये वाढली गर्दी; तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

यवतमाळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपुर्ण देशात मंकीपॉक्स आजाराची दहशत पसरली असताना त्यासमान लक्षणे दिसणाऱ्या आणि लहान मुलांमध्ये पसरणाऱ्या हॅन्ड, फुट, माऊथ या विषाणुजन्य आजाराने सध्या जिल्ह्यात थैमान घातले आहे. या आजाराची लागण झालेली मुले उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्णालयात येत आहे. हा आजार गंभीर नाही मात्र वेळात वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असल्याचा सल्ला या निमित्ताने डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपर्यंत सर्वत्र कोरोनाचा उद्रेक सुरू होता. त्यापाठोपाठ गेल्या काही दिवसांपासून उपचार उपलब्ध नसलेल्या मंकीपॉक्स या भीषण आजाराचे रुग्ण आपल्या देशात आढळुन आले आहेत. एकापाठोपाठ येणाऱ्या या आजारामुळे नागरिक चिंतेत असतानाच आता लहन मुलांमध्ये वेगाने पसरत असलेल्या हॅन्ड, फुट, माऊथ या विषाणुजन्य आजाराचे नवे संकट उभे ठाकले आहे. या आजारात लहान मुलांना हात, पाय आणि तोंड या ठिकाणी लहान लाल रंगाचे पुरळ उठत आहे. त्यासोबतच ताप येणे, थकवा जाणवणे ही लक्षणे या आजारात दिसुन येतात.

सुरूवातीला पुरळ येवुन ती जागा खाजवते आणि काही दिवसातच त्याचा ताप येतो. हा आजार अतीशय गंभीर नसला तरी तो विषाणुजन्य असल्याने त्याचा संसर्ग इतर मुलांना लवकर होण्याची शक्यता आहे. त्यातच लहान मुले मोठ्या संख्येने या आजाराने ग्रस्त होत असल्याचे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या मुलांच्या संख्येवरुन दिसुन येते. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे मुलांमध्ये दिसताच त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात यावे आणि संसर्ग असेपर्यंत ३ ते ७ दिवस मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेण्यास टाळावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

शाळांकडून पालकांना सुरक्षेच्या सुचना
हॅन्ड, फुट, माऊथ आजाराची लागण लहान मुलांना होण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे लहान मुले शिकत असलेल्या बऱ्याच शाळांनी त्यासंदर्भात पालकांना मॅसेज करुन माहिती दिली आहे. त्यासोबतच पाल्यांना अशा प्रकारची लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्या आणि पाल्यांना काही दिवस शाळेत पाठवण्याचे टाळा अशा सुचना त्या मॅसेजमध्ये देण्यात आल्या आहेत.

जंतुसंसर्ग कमी ठेवण्याचा प्रयत्न करा
हा इतर व्हायरल फीव्हर प्रमाणे एक आजार आहे. त्याची लक्षणे असणाऱ्या मुलांना जंतु संसर्ग कमी होईल अशी काळजी घ्यावी. त्यासाठी वारंवार हात स्वच्छ धुण्यासारखे आवश्यक उपाय करावे. हा आजार फार गंभीर नसला तरी मुलांना ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावे. या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना शाळेत पाठवणे टाळावे. डॉ. सारंग तारक, बालरोगतज्ज्ञ, यवतमाळ

बातम्या आणखी आहेत...