आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषींवर कारवाई होण्याची शक्यता:पंचायत समितीतील स्टोअरचे होणार ‘पोस्टमार्टेम’; सीईओंनी घेतला निर्णय

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैयक्तिक लाभाच्या योजनांचे साहित्य आजघडीस पंचायत समितीच्या स्टोअरमध्ये पडून आहे. ही बाब यवतमाळ येथील जुन्या पंचायत समितीच्या इमारतीतील चोरीच्या घटनेमुळे उघडकीस आली आहे. त्यामुळे सोळाही पंचायत समितीत प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता जिल्हास्तरीय समिती गठीत केली जाणार आहे. ही समिती पंचायत समितीतील स्टोअर, गोडावूनचे ‘पोस्टमार्टेम’ करणार आहे. यात दिरंगाई, कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाईसुद्धा प्रस्तावित केल्या जाण्याची शक्यता आहे.

पूर्वी वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांना पंचायत समितीतूनच साहित्य वाटप केले जात होते. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासन मोठ्या प्रमाणात विविध साहित्याची खरेदी करत होते. त्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना साहित्यांचे वाटप केले जात होते.

यातील बहुतांश लाभार्थ्यांना साहित्य वाटपच केले जात नव्हते. तर काही निवड झालेल्या लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साहित्य गोडावूनमध्ये पडून राहत होते. अशा प्रकारचे साहित्य आजही सोळाही पंचायत समितीत पडून आहे. ही बाब विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी आलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांच्या निदर्शनास आली होती. अशाच पद्धतीचे साहित्य पडून असल्याने आर्णी पंचायत समितीतील एक आरेखकावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर उर्वरित पंचायत समितीतसुद्धा चौकशी केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतू प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेच नाही.

अशात रविवार, १८ डिसेंबर रोजी यवतमाळ पंचायत समितीच्या जुन्या इमारतीतील गोदामात उघडकीस आलेल्या चोरीच्या घटनेवरून पुन्हा हा चर्चेचा विषय झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतली. सोळाही पंचायत समितीमध्ये स्टोअर, गोडावून तपासणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय पथक गठीत केले जाणार आहे.

या पथकातील कर्मचाऱ्यांनी तीन प्रमाणे ब्लॉक देण्यात येणार असून, सोळाही पंचायत समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. एकंदरीत साहित्य अडगळीत ठेवणाऱ्या तत्कालीन तसेच विद्यमान कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करू
पंचायत समितीत साहित्याबाबत माहिती संकलित केली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समिती गठीत केली जाणार असून, तपासणी सोयीची व्हावी याकरिता प्रत्येकी तीन ब्लॉक कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.- डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सीईओ.

बातम्या आणखी आहेत...