आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतवाडा शहरात आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळल्या जात असल्याची बाब समोर येताच सोमवारी (दि. ३) परतवाडा पोलिसांनी स्थानिक दोन बुकींसह चौघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, मंगळवारी (दि. ४) याच प्रकरणात पोलिसांनी सट्टा खेळणाऱ्या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या आयपीएलमध्ये क्रिकेटचे सामने सुरु आहेत. त्यामुळे या सामन्यांवर पैसे लावून सट्टा खेळणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. जुगार चालवणे हे बेकायदेशीर असताना शहरात तरुण मुले मोठया प्रमाणात सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी परतवाडाचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी सोमवारी सट्टा चालवणाऱ्या बुकींचा शोध घेऊन त्यांना पकडले. त्यावेळी काही व्यक्ती स्वत:च्या मोबाइलवर ऑनलाइन सट्टा खेळत असल्याचे पोलिसांना समजले.
त्यामुळे पोलिसांनी आयुष संजय हरदे (१९, हरदे नगर), निकुंज राजेश खंडेलवाल (२२, चावलमंडी अचलपूर), लक्ष्मण प्रभाकर जिचकार (विदर्भ मिल जुनी चाळ), किशोर पांडुरंग फणसे (समर्थ कॉलनी देवमाळी) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून ६८ हजार रुपये किमतीचे ५ मोबाइल आणि ४ हजार ५३० रुपये रोख असा ७२ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दरम्यान, परतवाडा शहरात दोन बुकींच्या माध्यमातून ३० ते ३५ जण सट्टा खेळत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यापैकी पाच जणांना मंगळवारी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.
संकेत शरद शेळके (ब्राम्हणसभा कॉलनी) व राम प्रकाश शर्मा (कश्यप पेट्रोलपंप मागे) हे दोघेही भागीदारी पद्धतीने चालवत होते. या क्रिकेट बुकींच्या माध्यमातून तरुणांना ॲप डाऊनलोड करुन युजर नेम व पासवर्ड दिला जात होता, अशी पोलिसांची माहिती आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक शशीकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल नवगिरे, ठाणेदार संदीप चव्हाण, मनोज कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.