आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधश्रद्धेचा अंधार:सात लाखांच्या पूजा अन् खंडीभर बोकडबळी;कोरोना होणार नाही, कारण गावात देवीची सवारी!

मंदार जोशी | आनंदवाडी (ता. दिग्रस)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्रसच्या आनंदवाडीत मास्क आणि लसीकरणाचे वावडे

यवतमाळ जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ७० किलोमीटरवरील आनंदवाडीतील ‘आनंद’ देवीच्या कृपेवरच आहे, अशी येथील लोकांची अंधश्रद्धा आहे. गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही, असं इथले लोक छातीठोकपणे सांगतात. कोरोना होऊ नये म्हणून खंडीभर बोकडांचे बळी दिले गेले. लोक ना मास्क वापरतात ना लस घेतात. कारण, ‘देवीची सवारी!’ गावात प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात चांदीची महाकाली आहे. देवीच्या सवारीमुळे कोरोना होणारच नाही अशी या गावकऱ्यांची अंधश्रद्धा आहे. जडीबुटी विकूनच ते गुजराण करतात. ग्रामस्थ मनोज चव्हाण यांनी सांगितले की, ‘आम्ही दवाखान्यात कधीच जात नाही. कोयता लागला, साप चावला तरी जंगलातील औषधी लावतो.’ कर्मचारी गावात तपासणीसाठी आले होते, पण लोकांनी सहकार्य न केल्याने ते १७ चाचण्या करून गेले. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू याची माहिती प्रशासनाकडेही नाही.

गावातच लग्न, बाहेरच्यांना बंदी
आनंदवाडीत सध्या दुसऱ्या गावातून, शहरातून येणाऱ्यांना प्रवेशबंदी आहे, पण गावात लग्नांचा धडाका सुरू आहे. या वर्षभरात गावातलीच मुलगी आणि गावातलाच मुलगा असे २० लग्न झाल्याचे गावकरी सांगतात. गाव प्रवेशबंदीच्या निर्णयामुळे यातील १७ जोडप्यांचे लग्न गावातल्या गावातच लागले. लग्नसोहळ्यात कोणीच मास्क वापरत नाही.

सात लाखांच्या पूजा,४ बोकडांचा बळी
रात्री देवीची पूजा करतो. आतापर्यंत गावाने ७ लाखांच्या पूजा घातल्या. भगताच्या अंगात देवीची सवारी आली. तिने सांगितले की, आम्हाला कोरोना होणार नाय. म्हणून आम्ही दवाखान्यात जात नाही आणि लसही घेणार नाही. खंडीभर बोकड दिले देवीला. आम्हाला काही होणार नाही. - मनोज चव्हाण, ग्रामस्थ

लोक शेतात पळून जातात
लोकांमध्ये अंधश्रद्धा, गैरसमज आहेत. ते आरोग्य यंत्रणेला सहकार्य करत नाही. कर्मचाऱ्यांवर चिडतात. तपासणीच्या धाकाने शेतात पळून जातात. तरीही आम्ही सरपंच, आशा सेविकांच्या मदतीने समुपदेशन करीत आहोत. - डॉ. कृष्णदास बानोत, तालुका आरोग्य अधिकारी
देवीच्या सवारीवरच भरवसा, देवीला चार बोकडांचे बळी दिले

बातम्या आणखी आहेत...