आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची प्रतीक्षा:कंत्राटदाराच्या दिरंगाईने वाढल्या अडचणी, जीवन प्राधिकरणाने शासनाकडे पाठवला प्रस्ताव, ‘अमृत’ ठरले दिवास्वप्न; मुदत संपून 31 महिने लोटले तरी काम अपूर्णच

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळकरांसाठी दिवास्वप्न ठरत असलेल्या अमृत शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या नाशिक येथील कंत्राटराच्या दिरंगाईमुळे मुदत संपून तब्बल ३१ महिन्यांचा कालावधी लोटूनही योजना पुर्ण झालेली नाही. त्यामुळे या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे असा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाच्या वतीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आता या प्रस्तावावर शासन स्तरावरुन काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र कंत्राटदाराच्या या दिरंगाईचा फटका बसुन शहरवासीयांसाठी महत्वाची असलेली योजना मात्र रखडली आहे.

गेल्या काही वर्षात शहराचा झालेला विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या या प्रमाणात भविष्यात ३० वर्षे शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा आणि शहरवासीयांना आठवड्याचे सात दिवस २४ तास पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने अमृत शहर योजनेअंतर्गत तब्बल ३१० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. ऑक्टोबर २०१९ पर्यंत ३० महिन्यात या योजनेचे काम पुर्ण करायचे होते. शहरापासुन ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंबळा धरणातून यवतमाळ शहरात पाणी आणण्याचे काम या योजनेअंतर्गत होणार होते. योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्याने कामही धडाक्यात सुरू करण्यात आले होते.

मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच पाणी आणण्यासाठी टाकण्यात आलेले पाइप निकृष्ठ असल्याने ते फुटले. तेव्हापासुन योजनेचे काम रेंगाळण्यास सुरूवात झाली. तब्बल १८ किलोमीटर टाकलेले पाण्याचे पाइप बदलण्यात आले. या कामासाठी ठेकेदाराने फार विलंब केला. त्यानंतर या योजनेअंतर्गत शहरात तयार करण्यात येणाऱ्या पाण्याच्या १६ नवीन टाक्या, ३ एमबीआर, २ संप, १ जलशुद्धीकरण केंद्र, शहरातील ५०० किलोमीटर पेक्षा अधिकची अंतर्गत पाइपलाइन आणि बेंबळा ते यवतमाळ शहरापर्यंत टाकण्यात येणारी ३२ किलोमीटरची मोठी पाइपलाइन टाकणे ही सर्वच कामे रेंगाळत गेली.

कंत्राटदाराकडुन होत असलेल्या या दिरंगाईसाठी जीवन प्राधिकरणाकडून वारंवार सुचना आणि तक्रारी करण्यात आल्या. इतकेच नव्हे तर योजना रखडत असल्याचे दिसल्याने मोठा दंडही ठोठावण्यात आला. मात्र त्या दंडाला कंत्राटदाराने उच्च न्यायालयात आव्हान देत त्यावर स्थगनादेश मिळवला. त्यामुळे सध्या योजनेसाठी असलेली मुदत संपून ३१ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही यवतमाळ शहरासाठी असलेली अमृत शहर पाणीपुरवठा योजना रखडुन पडली आहे. या सर्व बाबींसाठी कंत्राटदाराकडून करण्यात आलेली दिरंगाई जबाबदार असल्याचे सांगत आता जीवन प्राधिकरणाच्या वतीने अमृत योजनेच्या नाशिक येथील कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. वारंवार सांगूनही कंत्राटदारच दुर्लक्ष करीत असल्याने या अल्टीमेटममध्येही काम पुर्ण होणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...