आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे प्रमोशन:जिल्हा परिषदेत प्रशासक राज येताच 200 शिक्षकांचे प्रमोशन; शिक्षक भारती संघटनेने केले निर्णयाचे स्वागत

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्हा परिषदेत सदस्य, पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक राज सुरु झाले. या दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कुठलीही प्रसिध्दी न करता दोनशे पेक्षाही जास्त शिक्षकांना त्यांच्या हक्काचे प्रमोशन दिले. सन २०१७ पासून रखडलेले प्रमोशन दिल्याने शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे अभिनंदन केले असून निर्णयाचे स्वागत केले आहे.

गेल्या पाच वर्षापासून विविध शिक्षक संघटना शिक्षकांच्या प्रमोशन साठी प्रयत्न करीत आहे. मात्र जिल्हा परीषदेत कायद्याचा आधार घेत उणिवा काढून शिक्षकांच्या प्रमोशन मध्ये आडकाठी निर्माण केली जात होती. अनेक जन तर हक्काचे प्रमोशन न मिळाल्याने सेवा निवृत्त झाले आहे. दरम्यान २१ मार्च रोजी सदस्यांचा कार्यकाळ संपला आणि जिल्हा परीषदेत प्रशासक राज सुरु झाले. या दरम्यान शिक्षकांच्या प्रमोशन चा मुद्दा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मांडण्यात आला. त्यांनीही हा विषय गंभीरतेने घेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांना कार्यवाहीचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी वेगाने हालचाली करीत संपुर्ण कागदपत्रे तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सुपूर्द केली.

प्रशासकीय कार्यवाही करीत अवघ्या चार ते पाच दिवसात प्राथमिकच्या १९४ शिक्षकांना तसेच माध्यमिकच्या १७ शिक्षकांना मुख्याध्यापक पदी प्रमोशन देण्यात आले. या व्यतिरीक्त माध्यमिकचे चार पर्यवेक्षक, माध्यमिकचे १ उपमुख्याध्यापक तसेच प्राथमिक च्या १४ शिक्षकांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षापासून रेंगाळलेला प्रमोशन चा विषय क्षणात मार्गी लागल्याने शिक्षकांनी सुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आभार मानले आहे.

शिक्षकांना अधिकार मिळाला
प्रमोशन शिक्षकांचा हक्क आहे. परंतु कायद्याचा आधार घेत त्यांना डावलण्यात येत होते. प्रशासक राज येताच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कायद्याचा आधार घेत शिक्षकांना त्यांचा हक्क मिळवून दिला. निर्माण झालेल्या त्रुटी, उणिवा दुर करुन घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.
साहेबराव पवार, अध्यक्ष, शिक्षक भारती, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...