आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलवर ऑनलाईन सट्टा खेळवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवार, दि. ३० एप्रिलला रात्री भोसा मार्गावरील गजानननगरी परिसरात करण्यात आली. तय्यब शहा ऊर्फ बाबा उसमान शहा रा. सुंदरनगर भोसारोड, यवतमाळ आणि रोहण सुनील कदम रा. साईनगर, यवतमाळ अशी दोघांची नावे असून नंदू जैस्वाल, विनोद हिर्गणकर, तिवारी, दिनेश मुराब, सलिम शेख, सावजी, आणि शैलेश तिवारी यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील भोसा मार्गावर असलेल्या गजानननगरी परिसरात तय्यब शहा ऊर्फ बाबा हा मुंबई इंडियन्स विरूध्द राजस्थान रॉयल्स या आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळवत असल्याची माहिती सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, विकास मुंडे यांना मिळाली. त्यावरून शनिवारी रात्री पोलिसांचे एक पथक तयार करून धाड टाकण्यात आली.
यावेळी तय्यब शहा ऊर्फ बाबा उसमान शहा आणि रोहण सुनिल कदम हे दोघे मुंबई इंडियन्स विरूध्द राजस्थान रॉयल्स या आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनद्वारे सट्टा घेऊन पैशांची बाजी लावून जुगाराचा खेळ खेळवतांना मिळून आले. या दोघांकडून पोलिसांनी एक लॅपटॉप, ७ मोबाईल हॅन्डसेट व रोकड असा एकूण ४२ हजार ३९५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पोलिसांनी लॅपटॉपमधील आकडेवारीबाबत अधिक चौकशी केली.
दरम्यान तय्यब शहा ऊर्फ बाबा उस्मान शहा याची विचारपूस केली असता, यात सात सटोड्यांचा समावेश असल्याचे समोर आले. त्यावरून अवधुतवाडी पोलिस ठाण्यात नऊ जणांवर विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलमधील सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, विलास मुंडे यांच्यासह पथकातील गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, पंकज गिरी, अजय निबोळकर, सतिष सोनोने, चालक प्रवित कुथे, महीला पोलिस रोशनी जोगळेकर, प्रगती कांबळे यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.