आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट दारु:पुसद येथील उच्चभ्रू शंकरनगरातील बनावट दारु कारखान्यावर छापा

पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शंकर नगर या उच्चभ्रू वसाहतीत राजरोसपणे सुरू असलेल्या बनावट दारु तयार करण्याच्या कारखान्यावर छापा मारण्यात आला. नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने यवतमाळ एलसीबीच्या पथकासह मिळुन बुधवार दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई केली. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन शैलेश नावाच्या एका आरोपीस अटकही करण्यात आली आहे. मात्र यवतमाळ उत्पादन शुल्क विभागाला माहिती न होता नांदेडच्या पथकाने पुसदमध्ये केलेल्या कारवाईमुळे यवतमाळ उत्पादन शुल्क विभागाला चांगलीच धडकी भरली आहे.

पुसद शहरातील शंकर नगर परिसरात बनावट मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला हदगाव येथून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी पुसद शहरात येवुन गोपनीय पद्धतीने तपासणी केली. त्यानंतर यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोबत घेत नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने संयुक्त कारवाई केली. त्यात २ नोव्हेंबर रोजी पुसदमधील शंकर नगर परिसरातील एका उच्चभ्रू घरात छापा टाकण्यात आला.

या ठिकाणी बनावट दारु तयार करण्यात येत असल्याचे आढळुन आले. या कारवाईमध्ये घटनास्थळावरून शेकडो लिटर बनावट दारू, स्पीरीट, विविध दारु कंपनीचे लेबल व बुच, बनावट दारु तयार करण्यासाठी वापरण्याचे काही रासायनिक द्रव्य असा लाखो रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये आढळुन आलेली बनावट दारू या ठिकाणी तयार करून ती नांदेड जिल्ह्यात ठोक पद्धतीने विक्री केला जात होती. त्याची माहिती नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळताच त्यांनी पुसद येथील ‘ शैलेश ‘ नामक व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान नांदेडच्या भरारी पथकाने पुसद येथे येवुन कारवाई केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. पुसद शहरात वारंवार बनावट मद्यविक्री करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येत आहे. असे असले तरी शहरात हा धंदा जोमाने सुरू असतो. यवतमाळ जिल्हा उत्पादन शुक्ल विभाग आणि स्थानिक पोलिस प्रशासनाचे त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याने बनावट दारु तयार करणाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे. या कारवाईच्या वेळी पुसद येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रमोद खरात यांचेसह इतर कर्मचारी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे.

उमेशच्या घराचीही झाली झडती
तालुक्यातील रोहडा येथील पूर्वाश्रमीचा बनावट दारू विक्रेता आरोपी उमेशच्या घराची झडती भरारी पथकाने घेतली. भरारी पथक आल्याची माहिती होताच तो पसार झाल्याचे वृत्त होते. शंकर नगर येथील वस्तीतील घरात चालणाऱ्या कारखान्यावर छापा मारण्यात आला. त्या ठिकाणी बराच मुद्देमाल जप्त करुन येथे राहणाऱ्या शैलेश नामक व्यक्तीला अटक करून नांदेड येथे नेण्यात आले आहे. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात कुठे कुठे बनावट दारू पुरविली याची शहानिशा केल्यानंतरच माहिती देणार असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

पुसद बनावट दारू कारखान्याचे माहेरघर
पुसद शहरात यापूर्वी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक वेळा धाडी टाकून बनावट दारु तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली. मात्र असे असताना शहरात वारंवार नकली दारु तयार करण्याचे कारखाने सुरू करण्यात येते. त्यामुळे पुसद शहर हे नकली दारू बनविण्याचे माहेरघर झाले आहे. या ठिकाणी तयार होणारी नकली दारु विदर्भ, मराठवाडयात जोमाने विकली जात आहे. त्यातच आता शैलेश नामक व्यक्ती चौकशी केल्यानंतर त्याचे कनेक्शन विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्याचे उघड झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...