आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांची अवस्था बिकट:मार्च अखेरपर्यंत करावी लागणार प्रस्तावित वर्ग खोल्यांची दुरूस्ती

यवतमाळ ​​​​​​​20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्गखोली दुरुस्तीसाठी समग्र शिक्षाला गतवर्षी जिल्हा नियोजन समितीने जवळपास साडेआठ कोटी मंजूर केले होते. त्या अनुषंगाने ३२४ वर्ग खोली दुरुस्तीचे कामे प्रस्तावित होती. आता उर्वरीत चार कोटी रूपये लवकरच प्राप्त होणार आहे. तद्नंतर मार्च अखेरपर्यंत संपूर्ण निधी खर्ची करावा लागणार आहे. अन्यथा निधी परत जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पहिल्याच कामाचा खर्च मुख्याध्यापकांनी सादर केला नसल्याने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे. परिणामी, सन २०२१-२२ मध्ये जिल्हा नियोजन समितीने प्राथमिक शाळा दुरुस्तीच्या शीर्षकाखाली आठ कोटी ५९ लाख रूपयांना हिरवी झेंडी दाखविली होती. तद्नंतर चार कोटी ४७ लाख रूपयांच्या कामांना ३२४ वर्ग खोली बांधकाम, दुरूस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. ही यादी तयार करताना यु-डायसमधील डेटाकडे पुर्णता: दुर्लक्ष करण्यात आले होते. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तब्बल ४८ वर्ग खोली दुरुस्तीच्या एक कोटी ३ लाख रूपयांच्या कामांना कात्री लावली होती.

तद्नंतर नव्याने इतर तालुक्यातील शाळांची निवड मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली. शेवटी तालुकानिहाय संपूर्ण शाळांचा निधी जिल्हा परिषद बांधकाम विभाग एक आणि दोनकडे वळता करण्यात आला आहे. आतापर्यंत संपूर्ण शाळांची कामे होवून अहवाल प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर करणे गरजेचे होते. त्यानंतरच उर्वरीत चार कोटीहून अधिक रूपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होईल. वर्षाच्या अखेरपर्यंत निधी मिळण्याची शक्यता आहे.

विलंबाने सुरू झाली ४८ कामे
जिल्ह्यातील काही तालुक्याला झुकते माप दिले होते. याची कुणकुण लागल्यानंतर काही कामांच्या निधीला कात्री लावली. आणि नव्याने ४८ कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. या कामांना विलंबाने प्रशासकीय मान्यता मिळाल्याने प्रत्यक्षात सुरू होण्यास बराच कालावधी लागला. आणखी ही कामे पूर्णपणे आटोपली नाही.

समग्रच्या अभियंत्यांना मूल्यांकनाचे अधिकार
समग्र शिक्षामध्ये कनिष्ठ अभियंत्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे प्राथमिक शाळा बांधकाम, वर्गखोली दुरूस्तीसह इतरही कामांची जबाबदारी होती. मात्र, मागिल काही महिन्यापासून समग्रच्या कनिष्ठ अभियंत्यांचे अधिकार गोठवण्यात आले आहे. या शाळा दुरूस्तीमध्ये समग्रच्या कनिष्ठ अभियंत्यांवर केवळ मूल्यांकनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ते प्रकरण पडले थंडबस्त्यात
जिल्हा नियोजन समितीने निधी दिल्यानंतर काही तालुक्यातील शाळांना झुकते माप दिले होते. शेवटी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याबाबत आदेशित केले होते. तद्नंतर संपूर्ण प्रकरण थंड बस्त्यात पडले आहे.

त्या शिक्षकाचा कार्यालयीन हस्तक्षेप थांबवा
यवतमाळ

गेल्या काही वर्षांपासून प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणारे शिक्षक दयानंद चितळकर यांचा माध्यमिक शिक्षण विभागातील हस्तक्षेप त्वरीत थांबवावा, असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत यांनी एका पत्रान्वये दिले आहे.तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अप्रत्यक्षपणे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील शिक्षक दयानंद चितळकर कार्यालयीन कामे करीत होते. त्या कालावधीत विविध संघटनांनी आक्षेप घेतला होता. मात्र, कार्यालयातील हस्तक्षेप कुठल्याही प्रकारे थांबलाच नव्हता. नव्याने आलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या काळातही त्यांनी कार्यालयीन कामे करणे सुरूच ठेवले होते.

शेवटी काही संघटनांच्या प्रतिनिधींनी थेट आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे तक्रार दिली. त्यांनी याची दखल घेत मंगळवार, दि. एक ऑक्टोंबर रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत यांना पत्र पाठवून त्वरीत कार्यवाही करावी, असे सुचविले. शेवटी शिक्षणाधिकारी राऊत यांनी एक पत्र काढून हस्तक्षेप त्वरीत थांबवावा, असे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...