आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपून कित्येक महिने झाले आहेत. त्यातच आता जानेवारी महिना सुरू झाला आहे. असे असतानाही रेती घाटांचे लिलाव काही प्रशासकीय कारणास्तव रखडलेले आहेत. मात्र याच संधीचे सोने करीत जिल्ह्यातील रेतीघाटांवरुन रेतीची चोरी करण्याचा सपाटा रेती तस्करांनी सुरू केला आहे.
बेसुमार उपसा सुरू असल्याने लिलावापुर्वीच रेती घाट रिकामे होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचा फटका बसुन जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधीचा महसुल पाण्यात जात आहे हे विशेष. गेल्यावर्षी लिलाव करण्यात आलेल्या रेती घाटांची मुदत ३२ सप्टेंबर २०२२ पर्यंत होती. प्रत्यक्षात मात्र १० जुन रोजी रेतीघाटांमधुन उपसा बंद करण्यात आला होता.
त्यानंतर जिल्हा खनिकर्म विभागाने यंदा ३३ रेती घाटांच्या लिलावाची तयारी सुरू केली होती. त्यासंदर्भात आवश्यक असलेली जनसुनावणीची प्रक्रीया राबवण्यात येत होती. मात्र याचदरम्यान रेती घाट लिलावासंदर्भात शासनाचे नवे धोरण येणार असल्याचे सांगत लिलाव प्रक्रीया थांबविण्यात आली. त्यामुळे अद्याप पर्यंत जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव करण्यात आलेला नाही.
त्यामुळे दरवर्षी या वेळेपर्यंत रेती घाटाच्या लिलावातून शासनाला मिळणारा कोट्यवधीचा महसुल यंदा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत असतानाच दुसरीकडे याच परिस्थितीचा फायदा जिल्ह्यातील रेती तस्करांनी घेण्यास सुरूवात केली आहे. लिलाव न झाल्याने जिल्ह्यातील रेती घाट रेतीतस्करांसाठी मोकळे झाले असुन त्यांनी या रेतीघाटातुन रेतीची चोरी सुरू केली आहे. या रेतीघाटांवर लक्ष देण्यात महसुल आणि पोलिस यंत्रणा अपुरी पडत असल्याने या तस्करांचे चांगले फावत आहे.
दरदिवशी चोरीची रेती वाहुन नेणाऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाई त्याची साक्ष देतात. मात्र असे असतानाही रेती घाटांचे लिलाव तातडीने करणे किंवा लिलाव होईस्तोवर रेतीघाटांमधुन रेतीची चोरी थांबवावी यासाठी करण्यात येत असलेल्या प्रशासनाच्या उपाययोजना या ठिकाणी तोडक्या पडत असल्याचे सध्या स्थितीत दिसुन येत आहे. एकाच रॉयल्टीवर, रात्रीतुन २ फेऱ्या आपल्या जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यातील काही रेती घाटांचे लिलाव नव्या आदेशापूर्वी झाले आहेत. या रेतीघाटांवरुन उपसा केलेली रेती जिल्ह्यात आणण्यात येत आहे. त्यासाठी एकाच रॉयल्टीचा वापर करुन दिवसभरात एक आणि रात्रीतून २ अशा तीन-तीन फेऱ्या मारण्यात येत आहे. मारेगाव, वडकी, खैरी या सीमावर्ती भागातून राळेगाव, पांढरकवडा मार्गे ही वाहने येत आहेत.
वाहतुकीसाठी १२, १४ चाकांच्या ट्रकचा वापर
चंद्रपुर, वर्धा येथील रेतीघाटावरुन धारणीच्या नावाने रॉयल्टी घेवुन चक्क १२ ते १४ चाकांचे ट्रक निघतात. प्रत्यक्षात ही वाहने यवतमाळ येथे रिकामी करुन याच रॉयल्टीच्या वेळात रात्रभरात दोन फेऱ्या मारुन यवतमाळ पर्यंत रेती पोहोचवण्यात येते. त्यासाठी शहरातील रेतीव्यावसायीकानेही किरायाने घेतलेली मोठी वाहने या रेती वाहतुकीच्या कामी लाव ल्याची माहिती आहे.
ट्रॅक्टरने उपसा, टिप्परने वाहतुक
रेतीतस्करीमध्ये केवळ मोठे तस्करच नव्हे तर रेतीघाटाशेजारी असलेल्या गावांमधील अनेकांनी उडी घेतली आहे. ट्रॅक्टरच्या मदतीने दिवसा आणि रात्री शक्य त्या वेळी नदी पात्रातुन रेती भरुन शेत शिवारात एखाद्या ठिकाणी जमा करायची आणि अंधाराचा फायदा घेत जमा केलेली ती रेती टिप्परमध्ये भरुन न्यायची असा सपाटा सुरू करण्यात आला आहे. शेतशिवारात रेतीचे दिसुन येणारे लहान-मोठे साठे त्याची साक्ष देत आहेत.
अनेक तालुक्यात बेसुमार उपसा
रेतीघाटांचे लिलावच झालेले नसल्याने जिल्ह्यातील बाभुळगाव, घाटंजी, कळंब, राळेगाव, आर्णी, महागांव, उमरखेड, या तालुक्यांमध्ये असलेल्या रेतीघाटांवरुन रेती तस्करांनी रेती उपसा करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यासंदर्भात काही ठिकाणी कारवाई करण्यात येते. मात्र ही कारवाई नाममात्र असल्याने रेती तस्करांची हिम्मत वाढत चालली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.