आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:पैनगंगा नदीत रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या तस्करांना महसूलचे अभय; प्रहारचे महसूल मंत्र्यांना निवेदन

उमरखेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील उंचवडद आणि हातला या दोन रेती घाटांचा यावर्षी लिलाव झाला. परंतु लिलाव न झालेल्या इतर गावांच्या नदीपात्रांतून राजरोसपणे रेती उपसा करून त्याची साठेबाजी करणाऱ्या रेती तस्करांवर कार्यवाही करण्याऐवजी स्थानिक महसुल अधिकारी व कर्मचारी त्यांना पाठबळ देत असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान करित रेती माफियांकडूनच लाखोंची लुट होत असल्याने रेती तस्करांना अभय देणाऱ्या महसुल अधिकाऱ्यां विरुद्ध कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने महसुल मंत्र्यांकडे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

उमरखेड तालुक्यातील केवळ हातला व उंचवडद या दोन रेती घाटांची हर्रासी झालेली असतांना तालुका हद्दीतील कोपरा, बोरी, धारचातारी, मानकेश्वर, शिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, साखरा, खरुस, चालगणी या हर्रास न झालेल्या रेती घाटांतून मागील ५ महिन्यांपासून जेसीबीद्वारे अवैध रेतीचा उपसा करून ट्रॅक्टर - टिप्परद्वारे गावोगावी राजरोसपणे विक्री करणाऱ्या रेती तस्करांवर कार्यवाही करण्याची स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार हे तसदी घेत नाहीत. त्यामुळे स्थानिक कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या हिस्सेदारीत रेती तस्कर बिनधास्तपणे दररोज लाखो रुपये किमतीच्या गौण खनिजांची अक्षरशः लुट करीत आहे. मागील पाच महिन्यांपासून पैनगंगा पात्रावर ताबा मिळवून दररोज लाखो रुपये किमतीच्या गौण खनिजाचा उपसा केल्यानंतर जवळपासच्या शेतात हजारो ब्रास रेतीचे ढिगारे मारल्या गेले. याबाबत कोपरा, बोरी, धार चातारी येथे केलेल्या रेती साठ्याची जेसीबीद्वारे इतरत्र ठिकाणी विल्हेवाट लावली जात असल्याची तक्रार सोशल मीडियाच्या माध्यमातून चार दिवसांपूर्वी स्थानिक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व त्या उपरही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत संबंधित अधिकाऱ्यांनी रेती तस्करांना रेतीसाठ्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यासाठी एक प्रकारे मुभा दिली असल्याने रेती तस्कर ढिगाऱ्यांची विल्हेवाट लावण्यात मश्गुल आहेत. काही महसुल कर्मचारी व अधिकाऱ्यांची ही या रेती तस्करीत भागीदारी असल्याची चर्चा असल्याने कुठलाही महसुल अधिकारी हर्रास न झालेल्या पैनगंगा पात्राकडे फिरकला नाही. असा संशय व्यक्त करुन शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाचा फडशा पाडणाऱ्या रेती तस्करांसह त्यांना अभय देणाऱ्या संबंधित सर्व महसुल अधिकाऱ्यांविरुद्ध उच्चस्तरीय चौकशी नेमुन कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष राहुल मोहितवार यांच्यासह अंकुश पानपट्टे, प्रविण इंगळे, बालाजी भोयर, चंद्रकांत गायकवाड, संदिप घुले, अविनाश दुधे, सुनिल खोलगडे, श्याम चेके, मो. फयाज आदींनी राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...