आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातला पहिला सौर प्रकल्प:आत्मनिर्भर भारतासाठी विजेची भूमिका महत्वाची

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र मोदींना अपेक्षित भारत निर्माणात ऊर्जेची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक घरात वीज पोहोचवण्यात यश आल्याचे प्रतिपादन आ. मदन येरावार यांनी केले. सोमवारी नियोजन भवनात जिल्हा प्रशासन, महावितरण, महानिर्मिती, महापारेषणचा उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य कार्यक्रम पार पडला.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे, सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रा. पंकज पंडित, मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, मयूर मेंढेकर, सुरेश मडावी, दीपक देवहाते, सुनील शेरेकर आदी उपस्थित होते. आ. येरावार म्हणाले की, जिल्ह्यात गेल्या ८ वर्षात विकासाची अनेक कामे केली. यवतमाळ तालुक्यातील मांजर्डा येथे राज्यातील पहिला पायलट सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. तर जिल्ह्यात २८९१ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप बसवण्यात आले. दीनदयाल उपाध्याय, एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत ८५ कोटींच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. सौभाग्य योजनेत दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना मोफत, तर दारिद्र्य रेषेवरील ग्राहकांना ५०० रूपयात १४३० नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या.

उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत ११० कोटी खर्च करून पायाभूत सुविधा निर्माण केल्या, ५३५६ कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी येडगे यांनी ऊर्जा महोत्सवाच्या संकल्प व उद्दिष्टावर भर देण्याचे आवाहन केले. मेडा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांना गती देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. राळेगाव तालुक्यातील झाडगावात एमएसईबीचे कार्यालय पुराच्या पाण्यात होते. तरीसुद्धा कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतूक केले. वीज वितरण, पारेषण, महाजनकोने सर्वसामान्यांना देण्यात येणाऱ्या सेवा चांगल्या दर्जाच्या द्याव्या, असे आवाहन सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, संचालन मांगीलाल राठोड, माधवी वानखडे, तर आभार अधीक्षक अभियंता सुनील शेरेकर यांनी मानले.

ऊर्जा विकासाच्या दाखवल्या ७ चित्रफिती
महोत्सवादरम्यान पथनाट्य व ऊर्जा मंत्रालयाने तयार केलेल्या ऊर्जा विकासाशी संबंधित असलेल्या ७ चित्रफिती दाखवण्यात आल्या. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेत लाभ घेतलेल्या २५ लाभधारकांना सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...