आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चॉइस नंबरमधून आरटीओची बक्कळ कमाई; वर्षभरातच सव्वाकोटींचा महसूल जमा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन दुचाकी अथवा चारचाकी वाहन घेतल्यानंतर या वाहनासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून आपल्या आवडीचा क्रमांक घेण्याकडे वाहनधारकांचा कल वाढत आहे. या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात १ हजार ३५९ वाहनधारकांना पसंती क्रमांक देण्यात आले असून त्याद्वारे तब्बल १ कोटी २२ लाख २५ हजार पाचशे रुपयांचा महसूल आरटीओला प्राप्त झाला आहे.

लकी नंबर, मोबाइल नंबरचे शेवटचे चार आकडे, आकड्यांची बेरीज अशा विविध प्रकारच्या पसंती क्रमांकांना वाहनधारकाकडून मागणी होत असते. याचसाठी आरटीओच्या वतीने वाहनधारकांना वाहनांसाठी चॉइस नंबर घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. जिल्ह्यात दरवर्षी नवीन चारचाकी अथवा दुचाकी वाहन नोंदणी संख्या वाढत चालली असून यातील बहुतांश वाहनधारक आपल्याला वाहनांसाठी त्यांच्या आवडीचा क्रमांक मिळावा यासाठी आरटीओकडे अर्ज करत असतात.

आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणीची नवीन सिरीज सुरू झाल्यानंतर नियमाप्रमाणे काही विशिष्ट क्रमांकासाठी ठराविक रक्कम संबंधित वाहन धारकांकडून आरटीओ आकारत असते. तसेच एकाच क्रमांकासाठी जादा अर्ज असल्यास त्याचा लिलाव करून सर्वाधिक रक्कम देणाऱ्या वाहन धारकास तो पसंतीचा क्रमांक दिला जातो. विशेष म्हणजे पसंती क्रमांक घेण्याकडे वाहनधारकांचा ओढा दिवसेंदिवस वाढतच आहे.

राजकीय नेत्यांकडून अधिक मागणी
वाहनांच्या काही विशिष्ट क्रमांकाद्वारे राजकीय पदाधिकारी, नेते देखील ओळखले जातात. याचमुळे तोच क्रमांक आपल्या सर्व वाहनांसाठी मिळावा अशी मागणी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याचे माहिती या निमित्ताने समोर आली आहे.

चारचाकी वाहनांच्या सिरीजचा चॉईस नंबर दुचाकी वाहनांना
एखादा विशिष्ट क्रमांक चारचाकी वाहनासाठी सुरू असलेल्या सिरीजमध्ये उपलब्ध नसल्यास दुचाकी क्रमांकाच्या सिरीजमधून त्या वाहनधारकासह तो क्रमांक दिला जातो. मात्र त्यासाठी तिप्पट दराने त्यांच्याकडून फी आकारणी जात असल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वाहनधारकांची वाढतेय मागणी
आपल्या पसंतीचा क्रमांक मिळावा अशी वाहन धारकांकडून मागणी वाढत आहे. नवीन सिरीज सुरू झाल्यानंतर यासाठी नियमाप्रमाणे प्रक्रिया राबवत वाहनधारकांस क्रमांक दिला जातो.
ज्ञानेश्वर हिरडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

बातम्या आणखी आहेत...