आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव:समाजभूषण, अक्षर तपस्वी द. तु. नंदापुरे यांचा जिल्ह्याला अभिमान

यवतमाळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक, प्राचार्य, विविध पुस्तकांचे लेखक, स्वत:चे कपडे स्वत: चरख्यावर सुत कातून तयार करणारे समाजभूषण, अक्षरतपस्वी, महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार यासह अनेक पुरस्काराचे मानकरी द. तु. नंदापुरे यांचा जिल्ह्याला सार्थ अभिमान असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करतांना मनस्वी आनंद होत असल्याचे उद्गार निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे यांनी काढले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपक्रम राबवण्यात येत असून याअंतर्गत स्वातंत्र्याचा इतिहास व स्वातंत्र्य सैनिकांची माहिती प्रसारीत करावयाची आहे. यासाठी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या उपसमिती तर्फे द.तु.नन्दापुरे यांचा सत्कार निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपसमिती मध्ये ज्येष्ठ पत्रकार न.मा.जोशी, राजकुमार भितकर, श्रीकांत राऊत, गायक प्रा. राहुल एकबोटे, आकाशवाणीचे प्रमोद बाविस्कर व मंगला माळवे यांचा समावेश असून हे सर्व समिती सदस्य सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते.

द.तु.नन्दापुरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले की माझा जन्म १९३५ साली झाला असून समज आल्यापासून मी महात्मा गांधी यांच्या मार्गावर व साने गुरुजींच्या आदर्शानुसार साधेपणाने आपले जीवन जगत आहे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या सुखाचे बलीदान देवून कष्ट उपसले तर कित्येकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे, नवीन पिढीने याची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. न.मा.जोशी यांनी प्रास्ताविकेतून.

नंदापुरे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. भगवद् गीतेचा पद्यानुवाद करणाऱ्या ३६ लेखकांमध्ये द.तु.नन्दापुरे यांचा समावेश असून त्यापैकी आज रोजी ते एकमेव हयात असल्याचे त्यांनी सांगितले. तर राजकुमार भितकर यांनी जिल्ह्यातील स्वातंत्र्याचा इतिहास व स्वातंत्र्य सैनिकांची माहिती प्रसारित करण्यासाठी द.तु. नंदापुरे यांचे जीवन कार्यापासून प्रेरणा घेवून समिती आपले काम करेल असे सांगितले. संचालन आकाशवाणीच्या निवेदक मंगला माळवे तर आभार जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, माहिती कार्यालयाचे उपसंपादक गजानन जाधव, अपर्णा नंदापूरे, नीरजा नवले, अविनाश नवघरे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...