आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:पोलिओ लसीऐवजी 12 बालकांना पाजले सॅनिटायझर, यवतमाळ जिल्ह्यातील घटना; बालके रुग्णालयात, चौकशी सुरू

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागाच्या दुर्लक्षपणामुळे भंडारा जिल्ह्यात घडलेल्या जळीत कांडात १० बालकांचा बळी गेला. या घटनेची शाई वाळत नाही तोच यवतमाळ जिल्ह्यात पोलिओ लसीकरणादरम्यान १२ बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कापसी कोपरी या गावात घडला. ३१ जानेवारीला दुपारी लसीकरण झाले. यानंतर मुलांना त्रास होऊ लागल्याने सायंकाळी ही बाब लक्षात आली. तातडीने सर्व १२ बालकांना यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून यंदा ही लसीकरण मोहीम पार पाडायची होती. रविवारी घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथील लसीकरणाच्या बुथवर १ ते ५ वयोगटातील २ हजार बालकांसह त्यांचे पालक जमले. लसीकरण सुरू झाले. मात्र काही बालकांना पोलिओ डोस समजून सॅनिटायझरचे प्रत्येकी दोन थेंब पाजण्यात आले. रात्री सर्वांना त्रास सुरू झाला. गावाच्या सरपंचांनी लसीकरण केंद्रात जाऊन पाहणी केली असता बालकांना पोलिओ डोस नव्हे तर सॅनिटायझरचे थेंब पाजल्याचे लक्षात आले.

सॅनिटायझरचे दोन थेंबही धोकादायक : रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले की, हँड सॅनिटायझरमध्ये ७०% अल्कोहोल असते. त्याचे काही थंेब ताेंडावाटे अत्यल्प प्रमाणात पोटात गेले तरी ते प्राणघातक ठरत नाही. मात्र हे प्रमाणही बालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. असाच प्रकार प्रकरणात घडला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रात्री उशिरा रुग्णालयात धाव घेत मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली.

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यासह तिघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई
सॅनिटायझर पाजणाऱ्या त्या तीन कर्मचाऱ्यांवर सोमवारी संध्याकाळी उशिरा निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात समुदाय आरोग्य अधिकारी अमोल गावंडे, सविता पुसनाके, मसराम या आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्ष : लसीची कुपी ५ ते १० मिलीची, सॅनिटायझर बाॅटल किमान ५० मिलीची
तज्ज्ञांनुसार, शासकीय वितरणासाठी पोलिओ लसीची कुपी १५ ते २० थेंबांइतकी (५ ते १० मिली) असते. त्या उलट सॅनिटायझरची बॉटल किमान ५० िमली तरी असते. यामुळे जि. प. सीईओंंनी गफलतीचा दावा केला असला तरी हा साधा फरक थेट आरोग्य कर्मचाऱ्यांनाही समजू नये, याबद्दल पालकांत संताप व्यक्त होत आहे.

बाधित मुलांची प्रकृती स्थिर; मंगळवारपर्यंत डिस्चार्ज शक्य
बालकांना सुरुवातीला मळमळ-उलट्यांचा त्रास सुरू झाला. काहींना हातापायात गोळे आले. त्यांना रात्रीच यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलेे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना वैद्यकीय निरीक्षणात ठेवले आहे. मंगळवारपर्यंत डिस्चार्ज शक्य आहे.

दावा : पोलिओ लस-सॅनिटायझर एकत्र ठेवले, बाळांना चुकून तेच पाजले गेले
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ घटनेची चौकशी करत आहेत. त्यांनी दावा केला की, लसीकरण केंद्रात पोलिओच्या लसी व सॅनिटायझर्सच्या बॉटल्स एकत्रच ठेवलेल्या होत्या. ते सर्व पोलिओचेच औषध असल्याचे समजून आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याचे डोस बालकांना पाजले.

पंढरपूर : पोलिओ लसीच्या ड्रॉपरच्या प्लास्टिकचा तुकडा बाळाच्या पोटात
पंढरपूर | पोलिओ लसीसाठी भाळवणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दांपत्य एका वर्षाच्या बाळाला घेऊन आले होते. केंद्रातील महिला लांबूनच बाळांच्या तोंडात लस टाकत होती. हलगर्जीपणामुळे लसीबरोबरच तिच्या ड्रॉपरचे टोपणही (प्लास्टिकचा लहान तुकडा) बाळाच्या तोंडात गेला. बाळावर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...