आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल जाहीर:सौरभ दुधे, स्नेहा जाधव, पूजा राठोड, आर्णीच्या आसमाचे नेत्रदीपक यश; जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल दोन वर्षांनंतर पार पडलेल्या बारावीच्या ऑफलाईन परीक्षेत जिल्ह्याचा ९५. १३ निकाल लागला. बुधवार, दि. ८ जून रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर केला. यंदाही ९५. ७९ टक्के मुली, तर ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही विज्ञान शाखा निकालाच्या टक्केवारीत आघाडीवर आहे. विज्ञान ९९.३१ टक्के, वाणिज्य ९६.२९ टक्के आणि कला शाखेचा निकाल ९२.१३ टक्के आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मागिल दोन वर्षांत ऑनलाईन परीक्षाच पार पडली. गतवर्षी बारावीचा निकाल मूल्यमापनाच्या आधारावर काढण्यात आला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे ऑफलाईन परीक्षा पार पडल्या होत्या. यंदा बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण ३३ हजार ४४६ विद्यार्थी बसले होते. अर्ध्याहून अधिक शैक्षणिक वर्ष ऑनलाइनच पार पडले होते. शेवटच्या टप्प्यात महाविद्यालय चालू झाले होते. त दरम्यान, बुधवार, दि. ८ जून रोजी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यात ३१ हजार ८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये १६ हजार ८३६ मुले, तर १४ हजार ९८४ मुलींचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी महागाव तालुका निकालामध्ये आघाडीवर असून, याठिकाणी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के इतके आहे.

हलाखीच्या परिस्थितीवर केली ‘आसमा ‘ने मात

आर्णी । घरची परिस्थिती अत्यंत बेताची. वडिल खाजगी ट्रकचालक. ‘आसमा’च्या शिक्षणासाठी अक्षरश: त्यांनी कष्टाचे पाणी केले. रक्त आटवून केलेल्या परिश्रमाचे आसमाने मोल केले. अन् आयुष्याच्या वळणावर महत्त्वाच्या असलेल्या १२ वीच्या परीक्षेत नावलौकिक कामगिरी करीत वाणिज्य शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तिच्या यशामुळे मात्र वडिलांना अभिमानाच्या अश्रुधारांना निश्चित वाट मोकळी केली आहे. वाणिज्य शाखेतून आसमा सय्यद अक्रम हे अव्वल क्रमांकावर आहेत. आस्मा हिला ९०.५० गुण प्राप्त झालेले आहे. आर्णी येथे मोमीनपुरा येथे वास्तव्यास असलेले सय्यद अक्रम यांची मुलगी आसमा वाणिज्य शाखेतून प्रथम आल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तीच्या यशामध्ये समाजातील प्रश्नांना न्याय देणारे तिचे वडील पत्रकाराची ,श्री महंत दत्ताराम भारती शाळेचा देखील भूमिका बजावत आहे.

शेतकरी कन्या स्नेहाला मिळाले ९५.५० टक्के गुण

यवतमाळ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेच्या निकालात यवतमाळ येथील जगदंबा विज्ञान विद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहा जाधव हिने ९५.५० टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे. स्नेहाचे वडील दुर्योधन जाधव शेतकरी आहेत. त्यांच्याकडे आर्णी तालुक्यातील आंजी (ना.) येथे सहा एकर शेती आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी यवतमाळ गाठले. स्नेहाची मोठी बहीण चेतना नागपूर येथे उच्चशिक्षण घेत आहे. तर, लहान भावाने दहावीची परीक्षा दिली आहे. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचं असून, ग्रामीण भागात सेवा देण्याची इच्छा आहे. बारावीच्या निकालानंतर तिची नीट परीक्षेची तयारी सुरू आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आईवडील, शिक्षक व मार्गदर्शकांना देते. यशाने जाधव परिवारात आनंदाची लाट आली आहे.

शिकवणी शिवाय सौरभने मिळवले ९७.५० टक्के

दिग्रस । बुधवारी जाहीर झालेल्या १२ वीच्या निकालात येथील विद्याभारती इंग्लिश स्कुल व ज्युनिअर सायन्स कॉलेजचा विद्यार्थी सौरभ संदीप दुधे हा ९७.५० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. सौरव दुधे याने दहावी प्रमाणे यशाची परंपरा कायम राखत बारावीमध्ये सुद्धा घवघवीत यश संपादन केले. सौरव दुधे याने दहावीमध्ये १०० पैकी १०० टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केले होते. तीच परंपरा त्याने कायम ठेवत इयत्ता बारावी मध्ये ९७.५० टक्के गुण घेत दिग्रसमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश संपादन करण्यासाठी सौरव याने अथक परिश्रम घेतले. कुठलीही शिकवणी न घेता सतत १२ ते १४ तास अभ्यास केला. वेळोवेळी शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले त्याच्या या यशामध्ये शाळेचे शिक्षक कुलदीप नाईकवाडे, प्रसाद मुधोळकर, सुनील सोमकुवर, मारुती जाधव, सायली राऊत व शाळेचे मुख्याध्यापक अमोल खिल्लारे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

स्वप्न उराशी बाळगून करावी वाटचाल

यवतमाळ । गुणवत्ता प्राप्त बहुतांश विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर क्षेत्रासह स्पर्धा परीक्षेकडे वळतात ते आवश्यक सुद्धा आहे. प्रत्येकांनी स्वप्न उराशी बाळगून आपल्या आयुष्याची वाटचाल करणे गरजेचे आहे. आता मात्र, उद्योगासह व्यवसायाकडे गुणवंत विद्यार्थी वळावे ह्याकरीता शासन विचारविनिमय करीत आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना सुद्धा आहेत. भारत सक्षम करण्यासाठी आता युवकांनाच स्वता:हून पुढाकार घ्यावा लागणार आहे. गेली दोन वर्ष संपुर्ण जिल्ह्यात कोरोना परिस्थिती भयावह होती. अशा या गंभीर परिस्थितीतीवर विद्यार्थ्यांनी मात केली आहे.

बकऱ्या चारणाऱ्याची मुलगी कॉलेजात प्रथम

आर्णी । बारावीच्या परीक्षेमध्ये तालुक्यातील सुकळी या गावी राहणाऱ्या पूजा गोकुळ राठोड या विद्यार्थिनीने वाणिज्य शाखेत ८० टक्के घेऊन श्री. म. द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून प्रथम येण्याचा मान पटकवला आहे. पूजा हिचे वडील गोकुळ राठोड यांना एकूण पाच मुली आहेत. पूजाचे वडील हे बकऱ्या चारून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

इशीका म्हणते, रोजचा अभ्यास रोज, हीच यशाची चावी

यवतमाळ । नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वीच्या निकालामध्ये स्थानिक जगदंबा महाविद्यालयाची विद्यार्थीनी इशीका रिना काळे या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेत तब्बल ९५.८३ टक्के गुण प्राप्त केले आहे. दरदिवशीचा अभ्यास आणि सर्व कामे त्याच दिवशी पुर्ण करायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी आधीच्या दिवसाच्या अभ्यासाचा भार पडत नाही. नेमक्या याच सूत्रानुसार सुरूवातीपासूनच वागत आल्याने हा नियमितपणाच यशाची किल्ली ठरली .

बातम्या आणखी आहेत...