आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘स्काडा सिस्टीम’ने टळणार पाण्याचा अपव्यय; जीवन प्राधिकरणच्या वतीने शहरात काम सुरू

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजनेअंतर्गत नव्या नळयोजनेचे काम शहरात शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या आणि एमबीआर भरण्यासाठी मोटारींचा वापर करण्यात येतो. या सर्व मोटारी मॅन्युअली हँडल केल्या जातात. मनुष्यबळ कमी असल्याने बऱ्याचदा पाण्याच्या टाक्या भरुन पाणी वाहुन जाते. मात्र आता जीवन प्राधिकरण स्काडा (ऑटोमायझेशन अॅन्ड स्टार्ट) सीस्टीमचा वापर त्यासाठी करणार आहे. या सिस्टिममुळे पाण्याचा अपव्यय तर वाचणारच आहे सोबतच मनुष्यबळाचीही बचत होणार आहे.

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारी योजना जुनी झाल्याने काही वर्षांपुर्वी अमृत शहर योजनेअंतर्गत नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. त्यात पुर्वीच्या ९ पाण्याच्या टाक्यांव्यतिरिक्त नव्या १६ पाण्याच्या टाक्या आणि ३ एमबीआर तयार करण्यात आले आहेत. या पैकी कार्यान्वित झालेल्या सर्व ठिकाणी पाणी चढवण्यासाठी मोटारींचा वापर करण्यात येतो. या मोटारी जीवन प्राधिकरणचे कर्मचारी सुरू-बंद करतात. मणुष्यबळ कमी असल्याने काही मोजक्या कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी आहे. अशा स्थितीत बऱ्याचदा पाण्याची टाकी भरल्यानंतर कर्मचारी त्या ठिकाणी जाईपर्यंत हजारो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय होतो.

या सर्व अडचणी लक्षात घेता जीवन प्राधिकरणाच्या वतीने आता पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व मोटारी ऑटोमॅटिक सुरू-बंद होण्यासाठी स्काडा (ऑटोमायझेशन अॅन्ड स्टार्ट) सीस्टीम वापरण्यात येणार आहे. त्या सिस्टिमच्या मदतीने पाण्याची टाकी भरताच मोटार आपोआप बंद होणार आहे. एमबीआर भरला की, संप वरील मोटार बंद होईल आणि संप भरला की, जलशुद्धीकरण केंद्रावरील मोटार बंद होईल. त्यामुळे कुठेही पाणी विनाकारण वाहुन जाणार नाही. शीवाय प्रत्येक ठिकाणी आवश्यक असलेले मणुष्यबळ वाचणार आहे. या सर्व सिस्टिम वापर करण्यासाठी अगदी कमी मणुष्यबळ लागणार आहे. स्काडा (ऑटोमायझेशन अॅन्ड स्टार्ट) सीस्टीमचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या काही महिन्यातच ही सिस्टिम पुर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे. एका ठिकाणी मॉनिटरिंग रुममध्ये बसुन जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याचे संप, पाण्याचे एमबीआर आणि पाण्याच्या टाक्या या सर्व ठिकाणच्या मोटार हाताळता येणार आहे.

कार्यालय परिसरात मॉनिटरिंग रुम
स्काडा (ऑटोमायझेशन अॅन्ड स्टार्ट) सीस्टीमचा वापर करण्यासाठी गोधनी मार्गावर असलेल्या जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या परिसरातच मॉनिटरिंग रुम तयार करण्यात येणार आहे. या रुममध्ये बसलेले कर्मचारी ३ जलशुद्धीकरण केंद्र, ३ संप, ३ एमबीआर, २५ पाण्याच्या टाक्या या सर्व ठिकाणी कार्यान्वित होणाऱ्या या सीस्टीमचे मॉनिटरिंग करु शकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...