आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफएमएससाठी खटाटाेप:दोन वर्षात शाळांचे तिसऱ्यांदा बँक खाते बदलले, शिक्षकांना मनस्ताप; दोन हजार दोनशेहून अधिक शाळांचे खाते बंद

अमोल शिंदे | यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे बँक खाते दोन वर्षांत चक्क तिसऱ्यांदा बदलवण्याची वेळ शिक्षकांवर आली. वेळोवेळी बदललेल्या धोरणामुळे शिक्षकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, आता एचडीएफसी बँकेत नव्याने खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामधील शाळांचे संपूर्ण खाते बंद करण्यात आले आणि शिल्लक रक्कम शासन जमा झाली आहे. आता पीएफएमएस प्रणालीसाठी करण्यात येणाऱ्या खटाटोपामुळे शिक्षकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शासनाने संपूर्ण व्यवहार सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) च्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बहुतांश शासकीय व्यवहार पीएफएमएस प्रणालीतूनच केले जात आहेत. आता जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळांनासुद्धा अंतर्भूत केले आहे. त्या अनुषंगाने शाळांचे खाते असलेल्या बँकेतून ही प्रणाली राबवण्यात येणार होती. मात्र, खाते असलेल्या महाराष्ट्र बँकेने यासाठी असमर्थता दर्शवली होती. शेवटी राज्य शासनाने याबाबत केंद्र सरकारकडे मार्गदर्शन मागवले होते. यातून एचडीएफसी बँकेत खाते उघडण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सूचना दिल्या होत्या. दिलेल्या सूचनेनुसार चार महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला अवगत केले होते.

परंतु, गणवेशासह विविध प्रकारचा निधी बँक खात्यात असल्यामुळे तो निधी खर्चाची मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत दिली होती. त्या अनुषंगाने २६ सप्टेंबरला जिल्हा परिषदेच्या दोन हजार दोनशेहून अधिक प्राथमिक शाळांचे खाते बंद करण्यात आले. या बँक खात्यात जमा असलेला गणवेश, शाळा अनुदान यासह इतरही अनुदानाचे कोट्यवधी रुपये शासन जमा करण्यात आले. आता एचडीएफसी बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया शिक्षकांना करावी लागणार आहे. विशेष म्हणजे या बँकेच्या शाखा जिल्ह्यात बोटावर मोजण्याएवढ्याच आहेत.

आता या शाखेत जाऊन बँक खाते उघडण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठराव घ्यावा लागणार आहे. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षकांवर चक्क शाळा बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शाळांचे खाते उघडण्यात आले होते. दरम्यान, स्टेट बँकेनेसुद्धा याकरिता निरुत्साह दर्शवल्याने बँक ऑफ महाराष्ट्रात खाते उघडले होते. एकंदरीत दोन वर्षांत चक्क तिसऱ्यांदा बँकेचे खाते बदलवण्यात येणार असल्यामुळे शिक्षकांच्या मनस्तापात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक कार्यावर शिक्षकांचे लक्ष विचलित झाले असून, इतर कामातही शिक्षकांचा सर्वाधिक वेळ जात आहे. या बाबीकडे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

ऑनलाइनसाठी ठेवावी लागणार शाळा बंद
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शाळेतून झालेला व्यवहार ऑनलाइन करण्यासाठी शिक्षकांना बँकेत जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत एक शिक्षकी शाळेतील शिक्षकाला बँकेत जाण्यासाठी चक्क शाळा बंद ठेवावी लागणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही सुरू
एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यासाठी शासनाने निर्देश दिले. त्यानुसार शिक्षकांना पूर्वकल्पना दिली होती. सोळाही पं. स.च्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. आता सर्व शाळांचे बँक खाते झीरो करण्यात आले असून, लवकरच एचडीएफसी बँकेत खाते उघडले जाईल.- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग.

प्रक्रियेसाठी दोन महिने लागणार, त्यामुळे शाळांना व्यवहारातून वगळावे
बँक खाते उघडण्यासाठी शिक्षकांना आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे. खाते उघडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेऊन ठराव घ्यावा लागणार आहे. नंतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शिक्षकांना स्वत:च्या खिशातून शाळेचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पीएफएमएस प्रणालीतून शाळांना वगळवण्यात यावे.- ज्ञानेश्वर नाकाडे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.

बातम्या आणखी आहेत...