आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुसद तालुक्यातील आमटी येथील विवाहितेला येथील मेडिकेअर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीकरिता दाखल केले होते. या महिलेची नॉर्मल डिलिव्हरी करण्याऐवजी सिजरिंग करण्यात आले. सिजरिंग झाल्यानंतर एका गोंडस मुलीला जन्म देऊन काही वेळातच महिला दगावल्याची घटना ३ जूनला दुपारी २ च्या सुमारास घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांकडून केला जात आहे. महिलेच्या नातेवाइकांनी वसंतनगर पोलिस ठाण्यात डॉक्टरविरोधात तक्रार दिली आहे. माधुरी विकास व्हडगीर (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. पुसद तालुक्यातील वेणी येथील माधुरीचा विवाह एक वर्षांपूर्वी आमटी येथील विकास व्हडगीर सोबत झाला होता. विवाहानंतर माधुरी गरोदर राहिली. माधुरीला दि. २ जून रोजच्या रात्री कळा सुरू झाल्या. त्यामुळे तिला येथील मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीकरिता दाखल केले. प्रसुतीपूर्वीच मेडिकेअर व्यवस्थापकाने एक लाख रुपये डिपॉझिट जमा करण्याचे सांगितले. सोबतच दहा हजार रुपयांची औषधे देखील आणण्याचे सांगितले, अशी माहिती मृताची आई सुनीता मस्के यांनी दिली. प्रसुतीकरीता दाखल केलेल्या महिलेची नॉर्मल डिलिव्हरी करण्याऐवजी डॉक्टरने सिजरिंग करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नातेवाइकांनी सिजरिंग करण्याचे मान्यही केले. ३ जूनला सकाळी ६ च्या सुमारास सिजरिंग झाल्यानंतर महिलेने मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्ण व्यवस्थित होती. दुपारी १ वाजताच्या दरम्यान रक्तस्राव सुरू झाल्याने महिलेची तब्येत खालावली. डॉक्टरांनी नातेवाईकाला रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले. रक्ताच्या बॉटल्स उपलब्ध करून दिल्याचा दावा नातेवाइकांनी केला. मात्र ३ जूनच्या दुपारी २ वा. महिलेचा मृत्यू झाला. माधुरीच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना मिळताच त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. परंतु त्यांना समाधान न झाल्याने व डॉक्टरांच्या उपचारावर शंका निर्माण झाल्यामुळे नातेवाइकांनी वसंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पंचनामा करण्यात येवून माधुरीचे शव यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या उपस्थितीत ४ जूनला शवविच्छेदन करण्यात आले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू ^माधुरी हिची प्रसूती झाल्यानंतर ती बऱ्यापैकी बोलू लागली होती. केंव्हा सुट्टी होईल याबाबत मला विचारणा करत होती. तिला जेवण करायचे असे म्हणत होती. परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेवण देता येईल, असे सांगितले. माधुरी बोलू लागली. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला. सुनीता मस्के, माधुरीची आई.
बीपी जास्त होता ^माधुरी नावाच्या रुग्णाला सिझर अनेमिया होता. ज्या वेळेस भरती झाली त्या वेळेस बीपी दोनशे होता. हिमोग्लोबिनचे प्रमाण ८.५ ग्रॅम होते. जे अकरा ग्रॅम असणे आवश्यक असते. प्रसूतीदरम्यान रक्त वाहते. प्रसूतीकरिता माधुरीला ६ वा. भरती केले. साडेबारा वाजेपर्यंत व्यवस्थित होती. त्यानंतर रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या. त्यात डीआयसी झाली. नॉर्मल डिलिव्हरी होणारच नव्हती. नातेवाइकांना सांगितले होते. बाहेरगावी घेऊन जा, पण ऑपरेशन केल्याशिवाय प्रसूती होणार नाही असा सल्ला दिला होता. चार तास आयसीयूमध्ये होती. नातेवाइकांनी केलेले आरोप खोटे आहेत. डॉ. अरुणा पापळकर, पुसद.
आम्ही पैशाची मागणी केली नाही ^आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे. पेशंटला बाहेर गावी जाण्याची गरज पडू देत नाही. पेशंट आमच्याकडे डायनाक्लोज्टकडून रेफर झालेला आहे. आम्ही नातेवाईकांना एक लाख रुपयांची मागणी केलीच नाही. त्यांनी फक्त दहा ते पंधरा हजार रुपये जमा केले आहेत. उर्वरित पैसे मागितले सुद्धा नाहीत. आम्ही पहिले त्यांना प्रसूती होऊ द्या असे सांगितले. चार महिन्यांपासून नातेवाइकांनी माधुरीची तपासणी केली नव्हती. तिला आजार असल्यामुळे दगावली आहे. डॉ. वीरेन पापळकर, संचालक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.