आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक सात वर्षीय विद्यार्थी अचानक अपंग विद्यालयातून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही घटना शहरातील भोसा परिसरात असलेल्या पुण्यशील विक्रम बाबा निवासी अपंग विद्यालयात शनिवार, दि. ३० जुलैला सकाळी घडली. पाच तासानंतर तो विद्यार्थी नंद दीप फाउंडेशनला मिळताच त्याने अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून पोलिसांच्या ताब्यात दिले.
शहरातील भोसा परिसरात पुण्यशील विक्रम बाबा निवासी अपंग विद्यालय असून या विद्यालयात घाटंजी तालुक्यातील कोपरी कापसी येथील एका सात वर्षीय दिव्यांग मुलाची दोन दिवसापूर्वी प्रवेश करण्यात आला होता. शनिवारी सकाळी तो मुलगा अचानक विद्यालयाबाहर पडला. त्यानंतर तो चालत-चालत नागपूर बायपासपर्यंत पोहचला. यावेळी एका शेतकऱ्याला तो आढळून आल्याने त्याने त्या मुलाची विचारपूस केली. मात्र त्याला काहीच सांगता येत नव्हते. ही माहिती शहरातील नंद दीप फाउंडेशनचे संदिप शिंदे यांना देण्यात आली. दरम्यान संदिप शिंदे यांनी त्या ठिकाणी तातडीने पोहचून त्या मुलाला थेट अवधुतवाडी पोलिस ठाण्यात आणले.
यावेळी महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तासंतास त्याची विचारपूस केली, मात्र तो काहीच बोलत नव्हता. तर दुसरीकडे पुण्यशील विक्रम बाबा निवासी अपंग विद्यालयातून मुलगा बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. विद्यालयातील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी त्या मुलाचा शोध सुरू केला. मात्र तो कुठेच आढळून आला नाही. अखेर विद्यालयातील शिक्षक अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तब्बल पाच तासानंतर पोहोचल्याने तो मुलगा त्यांना आढळून आला. या प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी शिक्षकांची चौकशी करीत त्या मुलाचे कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर त्या मुलाला बाल कल्याण समिती समोर उभे करण्यात आले आहे. या पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दोन दिवसापूर्वी शहरातील एका शाळेतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र दुसऱ्या दिवशी त्या मुली सुखरूप पोलिसांना मिळून आल्या. त्यानंतर आता शनिवारी अपंग विद्यालयातील सात वर्षीय मुलगा नागपूर बायपास मार्गावर आढळून आला. या दोन्ही घटना पाहता शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.