आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती. हातावर पोट असलेल्यांसाठी ही थाळी कोराना काळात महत्त्वपूर्ण ठरली. मात्र मागील तीन महिन्यांपासून या योजनेचे अनुदान थकल्याने अल्पदरात हजारो नागरिकांचे पोट भरणाऱ्या चालकांवर केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. कोरोना काळात संचार बंदीमुळे खाण्यापिण्याची गैरसोय होत असलेल्या बेघर, स्थलांतरित, वाटसरू, मोलमजुरी करणारे तसेच गोरगरीब मजुरांना अल्पदरात जेवण मिळावे म्हणून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली होती.
मात्र जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यातील काही शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडल्याने त्यांना घरघर लागली आहे. येत्या काही दिवसांत अनुदान न मिळाल्यास केंद्र बंद करावे लागेल, अशा प्रतिक्रिया काही शिवभोजन थाळी केंद्र संचालकांनी व्यक्त केल्यात. असे झाल्यास आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांची परवड होईल.
अनुदान जमा करावे शासनाकडून शिवभोजन संदर्भात चर्चा सुरू आहे.परंतू, शिवभोजन केंद्र चालवताना अनुदानाची वाट न पाहता गोरगरिबांना दररोज भाेजन वाटप करावे लागते.केंद्र चालवण्यासाठी विविध स्तरावरून कर्ज काढण्यात आले.त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.शासनाने तीन महिन्यांचे अनुदान जमा करावे,अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकाकडून करण्यात येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.