आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक जागा:शिवसेना उद्धव ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाने जिंकल्या अधिक जागा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपली ताकद सिद्ध करण्याची संधी मिळाली होती. त्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटापेक्षा दोन ग्रामपंचायती जास्त जिंकण्यात यश मिळवले. त्यामुळे जिल्ह्यात शिंदे गटाच्या वाट्याला अधिक जागा आल्याचे दिसून येते. याशिवाय सरासरी विचार करता भाजपला जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश आल्याचे निकालावरून दिसून येते.ग्रामपंचायत निवडणुका म्हटल्या, की निकालानंतर जवळपास सर्वच राजकीय पक्ष आमच्या ग्रामपंचायती अधिक आल्या असा दावा करत असतात.

त्यांच्याकडून करण्यात आलेले दावे आणि इतर माहिती यानुसार जिल्ह्यात भाजपने या ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवल्याचे दिसत आहे. त्यात भाजप नेते आमदार मदन येरावार यांनी आपला गड राखल्याचे दिसते. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शिवसेनेच्या दोन गटात सुरू असलेल्या रस्सीखेचकडे लागले होते. राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेत पडलेल्या दोन गटांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यात जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमात्र आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटाची साथ देत सत्तेत सहभाग नोंदवला.

मात्र याचवेळी जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी ठाकरे गटात कायम राहिले. त्यामुळे या दोन्ही गटांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जोर लावला होता. मात्र निकाल हाती आल्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला १० ग्रामपंचातींमध्ये तर शिंदे गटाला १२ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाला दोन ग्रामपंचायती अधिक मिळाल्याचे दिसते. शिंदे गटाचे संजय राठोड यांनी आपल्या मतदारसंघात वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसून आले.

जिल्ह्यातील आठ नगर पालिका, जिल्हा परिषद आणि १६ पं. स.च्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या. या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार की, नाही याबाबत साशंकता आहे. अशा स्थितीत ही ग्रा.पं.ची निवडणूक लक्ष वेधून घेणारी होती. या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने गटबाजीत बाजी मारली असल्याने आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला एकत्रित जोर लावावा लागणार असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र
जिल्ह्यात काँग्रेसवर मरगळ आल्याचे चित्र काही वर्षात दिसत आहे. मात्र राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर झालेल्या या ग्रा. पं.निवडणुकीत काँग्रेसने एकट्याने २१ ग्रा.पं. काबीज केल्याचे सांगण्यात येत आहे. ही आकडेवारी मोठी असून या विजयाने इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्वी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होणार असल्याचे दिसत आहे.

पुसदमध्ये नाईकांचा दबदबा कायम
पुसद तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. इंद्रनील नाईक यांनी वर्चस्व कायम राखले. याच मतदारसंघात विधान परिषदेचे आमदार असलेल्या भाजपच्या अॅड. निलय नाईक यांना मात्र या निवडणुकीत आपली ताकद सिद्ध करता आली नाही. या निकालाचे परिणाम आगामी निवडणुकीवर झाल्यास त्यात आश्चर्य वाटू नये.

बातम्या आणखी आहेत...