आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनचा भंग:बाहेरुन शटर बंद, आत दुकानदारी सुरू; व्यावसायिकांचा अताताईपणा, आकाश मॉलच्या मालकाला 43 हजारांचा दंड

यवतमाळ2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दरदिवशी वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यु होण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे

संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात निर्बंध लादुन लॉक डाऊन लावले आहे. मात्र या लॉकडाऊनमध्येही अनेक व्यावसायिक दुकानांचे शटर बंद करुन व्यवसाय करीत आहेत. ६ मे रोजी शहरातील १४ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. त्या सर्वांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले असतानाच शुक्रवारी ७ मे रोजी मुख्य बाजारपेठेत असलेल्या आकाश मॉलवर कारवाई करुन तब्बल ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दरदिवशी वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यु होण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. लॉकडाऊनमध्ये सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. असे असताना इतर व्यावसायिकांकडून अवैधरीत्या व्यवसाय सुरू ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. शहरातील विविध भागात व्यावसायिक त्यांची दुकानांचे शटर बंद ठेवुन त्याआड व्यवसाय करीत आहे. ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच अशा व्यावसायिकांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यात गुरुवारी६ मे रोजी शहरातील १४ व्यावसायिकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान शुक्रवार दि. ७ मे रोजी प्रशासनाचे एक पथक मुख्य बाजारपेठेत गस्त घालत असताना त्यांना आकाश मॉल नावाच्या दुकानात शटर बंद करुन व्यवसाय सुरू असल्याची कुजबुज लागली. त्यावरुन त्यांनी या दुकानात कारवाई केली. या पथकाने दुकानात जावुन पाहीले असता दुकानात तब्बल १८ व्यक्ती आढळुन आल्या. त्यावरुन या पथकाने सर्व ग्राहकांना आणि दुकानातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. यावेळी सदर आकाश मॉलच्या चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या व्यावसायिकाला तब्बल ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुन्हा असा व्यवसाय केल्यास कोरोना परिस्थिती कायम असेपर्यंत दुकान सील करण्याचा इशारा देण्यात आला. उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनात महसुल, नगर पालिका आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. यावेळी मंडळ अधिकारी बेंद्रे, पालिकेचे नोडल अधिकारी डॉ. विजय अग्रवाल व कर्मचारी उपस्थित होते.

पुसद येथील हिराणी बंधु आणि गारमेंटला ठोठावला २५ हजारांचा दंड
पुसद | पुसद बाजारपेठेतील सर्वात मोठे गारमेंट व कापड दुकान असलेल्या हिराणी बंधु प्रतिष्ठानांवर प्रशासनाच्या संयुक्त पथकाने २५ हजारांची दंडात्मक कारवाई केली. दुकानाचे शटर लावुन आतमध्ये कर्मचारी ग्राहकांना माल देत होते. या एकाच दुकानामध्ये दोन दुकान असुन दोन्ही दुकाने उघडे असल्याचे दिसुन आहे. त्यानंतर एपीआय विजय रत्नपारखी, नंदु चौधरी, तहसीलदार अशोक गिते, मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांनी त्यांच्या पथकांसह या ठिकाणी छापा मारला. या दरम्यान दुकानामध्ये पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक मोठया प्रमाणावर कपडे खरेदी करण्यासाठी जमले होते. सोबतच दुकानामधील कर्मचारी यांनी सामाजिक अंतर पाळलेले दिसुन आले नाही. दोन्ही दुकानाला प्रत्येकी दहा हजार रूपये व प्रत्येकी २५०० असा एकुण २५ हजार रू. दंड आकारण्यात आला.

दुकानांमागील घरातून दिवसभर व्यवसाय सुरुच
शहरातील विविध भागात असलेल्या काही व्यावसायिकांची घरे त्यांच्या दुकानाच्या मागे आहेत. दुकानांच्या मागे असलेल्या त्यांच्या घरातून दुकानातील साहित्याची बिनदिक्कत विक्री करण्यात येत आहे. केवळ ७ ते ११ या कालावधीतच नव्हे तर दिवसभर अशा दुकानांमधून साहित्याची विक्री करण्यात येते. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

तर कोरोना संपेपर्यंत थेट दुकाने सील करणार
काही व्यावसायिक लॉक डाऊनच्या काळातही आपला व्यवसाय छुप्या पद्धतीने करीत असलेले दिसत आहेत. अशा व्यावसायिकांवर पहिल्यांदा दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र पुन्हा ते व्यावसायिक व्यवसाय करताना आढळुन आल्यास त्यांचे दुकान कोरोना काळ संपे पर्यंतच्या कालावधीसाठी सील करण्यात येईल. अनिरुद्ध बक्षी, उपविभागीय महसुल अधिकारी, यवतमाळ. शटर बंद करुन सर्रास दुकानदारी सुरू असल्याने प्रशासकीय पथकाने शहरातील आकाश मॉलवर कारवाई करुन ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बातम्या आणखी आहेत...