आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात मृग नक्षत्रात पाऊस येईल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली. परंतु, अपुरा पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे धूळ पेरणीला धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने मागील आठवड्यातच मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्या दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीची धूळपेरणी झाली. आता मात्र मान्सून रेंगाळल्याने या धूळपेरणीचा जुगार झाला आहे. कुठे पाऊस पडला, तर कुठे पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.
रोहिणी नक्षत्रात मान्सून अंदमान निकोबारच्या बेटावर दाखल झाला आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता. आता मात्र मान्सूनचा पाऊस पडलाच नाही. तर पडणारा पाऊस कमी प्रमाणात होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी कोरड्या जमिनीत केलेली धूळपेरणी संकटात सापडली आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास ९ लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तुरीचा पेरा सर्वाधिक असणार आहे. तर ज्वारी, बाजरी, तीळ, उडीद, मुगाची पेरणी त्या तुलनेत अल्प प्रमाणात होणार आहे. धूळपेरणी करताना प्रामुख्याने कपाशीची पेरणी केली जाते. यंदाच्या खरिपात जिल्ह्यातील शेतकर्यांनी जवळपास २० हजार हेक्टरवर धूळपेरणी केल्याचा अंदाज आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पण हा पाऊस कमी प्रमाणात पडल्याने आता मात्र पेरणी उलटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही धूळपेरणी संकटात सापडली आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे ते शेतकरी सिंचन पद्धतीचा वापर करून पिकांची उगवण करायच्या प्रयत्नात आहेत. तर त्यांना विजेच्या लपंडावाने हैराण केले आहे. अशातच कोरडवाहू शेतकरी मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. १०० मिलीमीटर पावसानंतरच पेरणी करावी. कमी पावसात जमिनीत ओलावा कमी प्रमाणात असतो. त्यामुळे पेरणी उलटण्याची शक्यता असते. म्हणून शेतकर्यांनी सध्या पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला असला तरी शेत शिवारात काही शेतकर्यांचा धूळपेरणीचा जुगार सुरूच आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.