आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:९० वर्षांची परंपरा लाभलेले श्री सिद्धिविनायक मंडळ; लोककलेच्या माध्यमातून सांकेतिक भाषेत आंदोलनाची भूमिका सांगितली जायची

सुरेंद्र मिश्रा | दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्तमान गणेशोत्सवाचे महत्त्व आणि भूमिकेचे सिंहावलोकन करायचे असेल तर त्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेशोत्सव आणि स्वातंत्र्य प्राप्ती नंतरचा गणेशोत्सव अशा दोन भागात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे आणि त्याचे अवलोकन करणे आवश्यक आहे. मुळातच स्वातंत्र्य प्राप्तीची धुरा या माध्यमातून सांभाळता यावी, वेगवेगळ्या ठिकाणी शक्तिस्थान निर्माण व्हावे, ते बलस्थान व्हावे आणि सामाजिक संघटनांचे शक्ती केंद्र व्हावे आणि यातून स्वातंत्र्य चळवळीचे काम पुढे नेता यावे या दृष्टीकोनातून सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली होती.

दिग्रस शहरांमध्येही या संदर्भामध्ये त्यावेळेस हालचाली सुरू झाल्या होत्या. यातूनच १९३२ मध्ये शहरातील संत कर्मा माई नगरमध्ये श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली. यामध्ये राममनोहर सोनी भोंगाडे गुरुजी, मोतीराम पाटील, सत्यनारायण श्रीवास आणि इतर सदस्यांनी पुढाकार घेऊन या मंडळाला उभारणी दिली. तेव्हापासून तर आजपर्यंत नव्वद वर्षाच्या दीर्घ कालखंडाचा प्रवास या मंडळाने पार केलेला आहे. आजही या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. पूर्वी जेव्हा मंडळाची स्थापना झाली त्या वेळेस मूर्तिकारांच्या माध्यमातून मूर्ती बनवण्याचे चलन नव्हते. म्हणून घरीच गणपतीची मूर्ती तयार करावी लागत असे. तर शोभायात्रा काढली जायची त्यावेळेस वाहनाची व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्या वेळेस चलनात असलेले वाहन म्हणजे बैलगाडी. शहरांमध्ये त्या वेळेस गणपती उत्सवाची जी शोभायात्रा निघायची त्यामध्ये डझनाने बैलगाड्याचा समावेश असायच्या. गणपती मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवायचे. प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यायचे. तर जुन्या काळातील शस्त्रविद्या जसे की तलवारबाजी दांडपट्टा चालविणे लाठी काठी लेझीम मल्लखांब अशा शारीरिक कसरतीची तालीम दिली जायची. तर लोककलेच्या माध्यमातून सांकेतिक भाषेतून आंदोलनाची भूमिका सांगितली जायची. शिवाय कला पथक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जायचे. या मंडळाच्या कामगिरीमुळे जवळपासच्या परिसरामध्ये नेहमीच या मंडळाबद्दल आकर्षण असायचे. ते आकर्षण आजही कायम आहे.

याही वर्षी मंडळाच्या वतीने साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जात आहे. सध्या पांडुरंग जामकर हे मंडळाचे अध्यक्ष आहे. येथील न्यायालयाच्या जुन्या इमारतीजवळ संत कर्मा माई नगर परिसरा मध्ये याचे स्थान आहे. मंडळाच्या वतीने त्या परिसरामध्ये स्थायी चबुतरा तयार केलेला आहे. गणेश उत्सव झाल्या नंतर हा चौथरा तसाच असतो. वेळोवेळी या ठिकाणी परिसरातील भाविक दिवाबत्ती करीत असतात. शहराच्या सार्वजनिक आध्यात्मिक उत्सवाचे हे एक ऐतिहासिक ठिकाण आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे.

पुढेही वाटचाल सुरू राहील
सामाजिक एकोपा व प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून दरवर्षी उपक्रम घेतले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ अशा दोन्ही कालखंडात मंडळाची वाटचाल राहिली आहे. पुढेही मंडळाची वाटचाल सुरू राहील.
पांडुरंग जामकर, अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ,दिग्रस

बातम्या आणखी आहेत...