आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपकरी एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने सेवेत रुजू होण्याचे आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने एसटी महामंडळाने आता सेवानिवृत्त चालकांना सेवेत रुजू होण्याची हाक दिली आहे. या संदर्भात चालक भरतीच्या प्राथमिक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अनेकदा आदेश देऊन कर्मचारी कामावर हजर न झाल्याने महामंडळाने आक्रमक पवित्रा घेत सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना कामावर येण्याची संधी दिली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली असून चालकाचे वय ६२ वर्षे पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक आहे.
करार पद्धतीवर नेमणूक होणाऱ्या चालकांना दरमहा (२६ दिवस) २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले त्या विभागांमध्ये करार पद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकणार आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये अर्ज करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
दोन महिन्यांपासून सेवा विस्कळीत, प्रवाशांच्या सेवेसाठी निर्णय
दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत आहे. प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने निवृत्त चालकांची करार पद्धतीने नेमणूक करण्याचे ठरवले आहे. -सुनील मडावी, कामगार अधिकारी, यवतमाळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.