आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्तारोको:अतिवृष्टी जाहीर न केल्याने साखरा येथे बैल बंडी उभी करून रास्तारोको

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. दुबार तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने दिग्रस तालुक्याला अजून अतिवृष्टी जाहीर केली नाही. तसेच शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. परंतु आजही ती मागणी पूर्ण न झाल्याने तालुक्यातील साखरा येथील वसंत प्रतिष्ठान व शेतकऱ्याच्या वतीने दि. ५ सप्टेंबरला सकाळी दिग्रस दारव्हा मार्गावरील तालुक्यातील साखरा रस्त्यावर बैल बंडी उभी करून हातात तिरंगा झेंडा व फलक घेऊन नारेबाजी करीत सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजे १५ मिनिट रास्ता रोको आंदोलन पुकारले.

दिग्रस तालुक्यातील साखरासह तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकांचे अति पावसामुळे अतोनात नुकसान झाले असूनही शासकीय दरबारी दिग्रस तालुक्याला अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करून ५० हजार हेक्टरी मदत घ्यावी अशी मागणी साखरा वसंत प्रतिष्ठान व शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली होती ती पूर्ण न झाल्याने आज त्यांनी साखरा येथे रास्ता रोको करण्याचा पवित्रा घेऊन १५ मिनिट रास्ता रोको केला.

त्यामुळे दिग्रस दारव्हा रस्त्यावरील साखरा गावाच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटर वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको आंदोलन दरम्यान उत्साही तरुणांनी वंदे-मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान चा नारा देत आंदोलन करून परिसर दणाणून सोडला होता. सततच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले असून कर्ज काढून दुबार-तिबार पेरणी केल्याने आता कर्ज कसे फेडावे ? मुले-मुलींचा शिक्षण कसे पूर्ण करावे, मुलींचे लग्न कसे करावे असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडला. रास्ता रोको सुरू असतांना पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा सकाळी ९.४५ मिनिटांनी सुरू केलेला रास्ता रोको सकाळी १० वाजता आंदोलन मागे घेतले.

यावेळी पोलीस निरीक्षक धर्मराज सोनुने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी, कैलास घट्टे, विशाल बोरकर, देवानंद कायंदे, विनाश जाधव, गोपनीय शाखेचे सचिन राऊत, चेतन चव्हाण यांनी रस्ता सुरळीत केला. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतांनाच स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र मंत्रिपदे मिळवून पन्नास खोक्या मध्ये ओक्के झाले असल्याची तिव्र नाराजीची शेतकऱ्यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या. दिग्रस तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्राना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी दिग्रस तालुका सरसकट अतिवृष्टी जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी रास्ता रोको आंदोलनकर्ते वसंत प्रतिष्ठान व शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे.

या रास्तारोको आंदोलनात वसंत प्रतिष्ठान अध्यक्ष विशाल चव्हाण, सचिव पवन आडे, गोपाल जाधव, जय चव्हाण, किरण राठोड, नितु नाईक, रुपेश जाधव, संघर्ष राठोड, विरज आडे, सचिन आडे, हितेंद्र राठोड, रोशन राठोड, सुनिल आडे, अमित राठोड, प्रितम चव्हाण, ज्ञानेश्वर राठोड, कुणाल चव्हाण , जय चव्हाण, रोहिदास राठोड, गजानन राठोड, दिपक चव्हाण, अनिल जाधव, गोकुळ चव्हाण, राम राठोड, प्रविण चव्हाण सह वसंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शेतकरीवर्ग उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...