आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिगरशेती कर्ज प्रकरणातील थकीत कर्जाची रक्कम वाढत चालली आहे. या रकमेच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेच्या वतीने आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आयोजित विशेष बैठकीमध्ये सर्व संचालकांनी एकमुखी निर्णय घेत वाढलेला एनपीए कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यास मंजुरी दिली. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणुन ओळखल्या जाते. मात्र शेतकरी सभासदांना देण्यात आलेल्या कर्जाव्यतिरिक्त देण्यात आलेल्या बिगरशेती कर्ज प्रकरणात कर्जदारांकडे अधीक थकबाकी झाली आहे. यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून बँकेकडुन वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ही बाब लक्षात घेता याच प्रकरणासंदर्भात आढावा घेवुन वसुलीसाठी प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हा बँकेच्या संचालकांची विशेष बैठक घेण्यात आली. त्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून थकीत असलेल्या बिगरशेती कर्ज प्रकरणांपैकी १५० प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. या प्रकरणांपैकी २१ प्रकरण नियमीत झाले आहेत. मात्र ज्यांच्याकडे मोठी थकबाकी आहे त्यांच्याकडून अद्याप भरणा झालेला नाही.
यापैकी काही कर्जदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या थकबाकी वसुलीसाठी काय करता येइल यावर या सभेत चर्चा झाली. त्यानंतर थकबाकी वसुली करण्यासाठी बँकेला कठोर भुमीका घेवुन प्रभावी कारवाई करावी लागेल असा निर्णय सर्व संचालकांनी घेतला. त्यामुळे येत्या काही दिवसातच थकबाकीदारांकडुन वसुली करण्याची मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याव्यतिरिक्त चालु आर्थीक वर्षातील बँक स्तरावरील आणि संस्था स्तरावरील कर्ज मागणी, वसुली यासंदर्भात विस्तृत आढावा या बैठकीत घेण्यात आला. बँक स्तरावर शासनाच्या ओटीएस योजनेअंतर्गत अध्यक्षांनी मंजुरी दिलेल्या प्रकरणास बैठकीत मान्यता देण्यात आली. विभागीय पोट समित्या आणि विभागीय मंडळे याच्या गठणासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सायंकाळी उशीरापर्यंत चाललेल्या या बैठकीमध्ये दोन विषयावर बराच काळ चर्चा झाली.
जप्तीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात
बीगरशेती कर्जदारांपैकी मोठी रक्कम थकविणाऱ्या १५ कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करुन त्याचा लिलाव करण्यासंदर्भात परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे एक प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावासंदर्भात अद्याप कुठलीही परवानगी प्राप्त झाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.