आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर दत्तक ग्राम वाघापूर येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे. शिबिरामध्ये ११ मार्च रोजी संगीत विभागाच्या वतीने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना स्वरमयी आदरांजली म्हणून त्यांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम ‘स्वरलतेच्या हिंदोळ्यावर’ सादर झाला.
प्रा. डॉ. दुर्गेश कुंटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि संगीत विभाग प्रमुख डॉ. अर्चना देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या कार्यक्रमामध्ये एकूण १८ कलावंतांनी सहभाग घेतला, यात संगीत विभागाच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थिनींचा, माजी विद्यार्थिनींचा आणि प्राध्यापकांचा सहभाग होता. राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित कलावंतांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. स्वर कोकिळा लता दीदींच्या स्वरांनी सजलेली मानवी मनातील अनेकविध तरल भावना उलगडून दाखविणारी विविध गीताकारांनी शब्दबद्ध केलेली आणि प्रतिभा संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली लोकप्रिय बहारदार हिंदी मराठी गीते यावेळी सादर करण्यात आली.
या कार्यक्रमात स्वरांगिनी कुडमेथे, अवंती पांचाळ, स्नेहा जतकर, मीनल राऊत, मयुरी पांडे, संध्या रोहनकर, साक्षी काळे, दर्शना दांडेकर, शविानी चौकडे, सलोनी सुक्ते, प्रा. जया तेलंग, प्रा. मोहिनी कुडमेथे, प्रा. वैशाली वाटकर, डॉ. सुधा खडके, डॉ. संतोष गोरे, डॉ. चंद्रशेखर कुडमेथे, डॉ. ज्वाला नागले यांनी सुमधूर दर्जेदार गीतांमधून उपस्थित श्रोत्यांचे आणि शिबिरार्थी विद्यार्थिनींचे मनोरंजन केले. संवादिनीवर अतिशय समर्पक आणि चित्तवेधक साथसंगत डॉ. चंद्रशेखर कुडमेथे यांनी तर तबला संगत प्रकाश कुमरे यांनी केली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दर्शना सायम, प्रा. स्मिता मोहोड, डॉ. सुधा खडके, प्रा. शैलेंद्र तेलंग, डॉ. संतोष गोरे, नितीन वालदे यांनी सहकार्य केले. विविध मनो भावनांच्या तरल अविष्काराने आणि तितक्याच उत्तम सादरीकरणाने उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ‘स्वरलतेच्या हिंदोळ्यावर’ या संगीत मैफलीचा आस्वाद रसिकांनी भरभरून घेतला आणि मनसोक्त दाद दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.