आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलंब करण्याऱ्यांवर कारवाईचा इशारा:लोकशाही दिनातील प्रकरणावरून विभाग प्रमुखांना दिली तंबी

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाही दिनात अर्ज प्राप्त झाल्यावर सात दिवसाच्या आत रिपोर्ट मागून त्यावर सुनावणी घेऊन तक्रार निकाली काढावी. कोणत्याही परिस्थितीत विलंब झालेला खपवून घेतला जाणार नाही. तक्रारी निकाली काढण्यात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तकात त्याची नोंद घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिला. सोमवार, दि. ५ डिसेंबर रोजी बचत भवन येथे लोकशाही दिन पार पडला.

लोकशाही दिनात विविध प्रकारच्या तक्रारी येतात. या तक्रारींचा निपटारा त्वरीत करावा, असे आदेश देण्यात आलेले आहे. तरीसुद्धा विभाग प्रमुख ह्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात. अशा विभाग प्रमुखांना सोमवार, दि. ५ डिसेंबर रोजी पार पडलेल्या लोकशाही दिनाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी दिली. ज्या विभागाने एक महिन्याच्या आत तक्रारी निकाली काढल्या नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येईल. त्याचबरोबर कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे, अभ्यागताना वेळ देणे, तक्रार व्यवस्थित नोंदवणे आदी बाबी विभाग प्रमुखांनी व्यवस्थितरीत्या पार पाडाव्यात, अशाही सुचना दिल्या. यापुढे प्रत्येक कार्यालयातील चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक लोकशाही दिनात प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याचबरोबर काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ही सत्कार करण्यात येईल.

समाधान शिबिरासाठी प्राप्त झालेल्या अर्जावर रवविार, ११ डिसेंबर पर्यंत कार्यवाही करावी. अर्जावर नियमानुसार कार्यवाही करावी. एखादी बाब किंवा काम शासनाकडे पाठवणे आवश्यक असल्यास तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात. लोकशाही दिनी एकुण १५४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर लोकशाही दिनात अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, तसेच इतर सर्व विभाग प्रमुख, अधिकारी बैठकीस हजर होते.

बातम्या आणखी आहेत...