आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शाळेची पटसंख्या ही शिक्षकांनी स्वतःची पत समजावी ; राठोड

दिग्रस24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांबरोबर समाजाचा अर्थात राष्ट्राचा विकास होत असतो. म्हणूनच समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना फातेमा शेख शिक्षक सन्मान देऊन गौरवण्याचा विशेष सोहळा डॉ. एपीजे अब्दुल कलाम फोरमने आयोजित केला होता. शिक्षक दिनाच्या औचित्यावर आयोजित या सोहळ्यात तालुक्यातील व परिसरातील विविध व्यवस्थापनात कार्यरत २१ शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

शैक्षणिक सुधारणांसाठी वाहिलेली सामाजिक संस्था म्हणून डॉ. कलाम फोरम तालुक्यात सुपरिचित असून, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील ‘गुरुकुल सीबीएसई इंग्लिश स्कूल’मध्ये ‘दिनबाई’ शाळेचे माजी प्राचार्य, विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा. सतीशचंद्र बोबडे यांच्या हस्ते फातेमा शेख शिक्षक सन्मान वितरित करण्यात आले. यावेळी ठाणेदार धर्मराज सोनुने, मुख्याधिकारी सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी रमेश खरोडे, माजी प्राचार्य ज्योती निचत, गुरुकुल शाळेच्या प्राचार्य आबेदा बेगम, उप प्राचार्य शरीफ शेख उपस्थित होते. डॉ. कलाम फोरमचे मुख्य प्रवर्तक मिर्जा अफजल बेग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना नगर पालिका मुख्याधिकारी सुधाकर राठोड यांनी सरकारी शाळांच्या ढासळत्या पटसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, शिक्षकांनी शाळेचा ‘पट’ ही आपली ‘पत’ समाजावी. सरकारी शाळांचा पट वाढणे आवश्यक असून, त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

माजी प्राचार्य ज्योती निचत, गट विकास अधिकारी खरोडे, प्रा. सतीश बोबडे यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले अनुभव उपस्थितांसमोर ठेवत शिक्षकांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात मोहसीन बेग, चेतन जाधव, वैभव पारधी या विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद, नगर पालिका, खाजगी शाळा, विना अनुदानित शाळा, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या शाळेत कार्यरत शिक्षकांना फातेमा शेख सन्मान प्रदान करण्यात आले. कपिल बोरुंदिया, नाजनीन शेख, अभिजित कपिले, विमल पंचपुत्रे, संजय चिंते यांनी सत्काराला उत्तर दिले. शिक्षक सन्मान सोहळ्याचे संचलन आमीन चौहान तर आभार क्रीडा शिक्षक आसिफ काजी यांनी मानले. राष्ट्रगीताने या सत्कार सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फोरमचे अध्यक्ष फिरोज खान, समशेर खान कुरेशी, अरबाज धारिवाला, फैय्याज शेख, सलीम शेख, मिर्जा नासिर बेग, अता उर रहेमान, फारूक चव्हाण, जुनेद शेख, सैय्यद शोएब तसेच गुरुकुल इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...