आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागंभीर गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी नवे पोलिस अधीक्षक डॉ. बन्सोड अॅक्शन मोडवर आले आहे. जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी आणि ठाणेदार यांना एक एक केस दत्तक देण्यात आली आहे. कुठल्याही गुन्ह्यातील साक्षीदार फितूर होणार नाही, याबाबतची काळजी संबंधीत अधिकाऱ्यांना घ्यायची असून वेळोवेळी त्या केसचा फॉलोअप घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
यवतमाळची गुन्हेगारी महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. त्यात नव्याने उदयास आलेल्या नवनवीन टोळ्या आणि त्या टोळ्यात उडणारे खटके असे अनेक प्रकारे समोर येत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दंगल आदींसह गंभीर गुन्ह्यांच्या घटना आजपर्यंत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. घटना घडल्यानंतर पोलिसांत गुन्हे होतात. प्रकरण न्यायप्रविष्ट होते, परंतू पंचनामा, केलेल्या चौकशीतील कागदपत्रांचा आधार घेऊन अनेक आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटत आहे. असे आरोपी पुन्हा बाहेर आल्यानंतर गंभीर गुन्ह्यात सहभागी होत असून, त्यांच्याकडून वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत.
यावरून पोलिसांचा तपास कुचकामी पडत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशा घटनांतील आरोपींवर पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पावले उचलले आहे. गेल्या काही वर्षांतील अनेक प्रकरण (केस) सध्या न्यायप्रविष्ट झालेली आहेत. बहुतांश प्रकरणाची सुनावणी सुद्धा लागली आहे. या सुनावणीत सरकारी वकिलाचा युक्तिवाद महत्वाचा ठरत आहे, परंतू पंचनामा, चौकशी करताना झालेल्या थोड्याफार चुकांमुळे आरोपीचे फावते होत आहे. आता असा प्रकार घडू नये ह्याकरीता नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी नविन फंडा तयार केला आहे. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाच्या दोन केसेस उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना सोपवण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे संबंधित पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांकडेसुद्धा एक केस असे दत्तक देण्यात आली आहे. दत्तक दिलेल्या केसची इत्थंभूत माहिती, कागदपत्रांची जुळवाजुळव, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार आदींकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहे. प्रकरणाचा फॉलोअप उपविभागीय अधिकाऱ्यांसह ठाणेदारांना वेळोवेळी घ्यावा लागणार आहे. आवश्यकतेनुसार सरकारी वकीलांशीसुद्धा चर्चा, केसमधील अडीअडचणी आदी हालचालीवर लक्ष केंद्रीत करावे असेही आदेश दिले आहे. गंभीर स्वरूपातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यास डागाळलेली पोलिसांची प्रतिमा सुद्धा उंचावल्या जाण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतलेल्या निर्णयाचा किती फायदा होईल, ती येणारी वेळच सांगेल.
एसपी घेणार केसेसचा फॉलोअप
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह ठाणेदारांना दत्तक दिलेल्या केसेसचा नियमितपणे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड फॉलोअप घेणार आहे. यातील त्रृट्या, अडीअडचणी सुद्धा त्यांच्या माध्यमातून सोडण्यात येईल. त्यामुळे खुद्द उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह ठाणेदारांना दत्तक घेतलेल्या केसचा अभ्यास करणे गरजेचे बनले आहे.
पोलिसांची प्रतिमा उंचावेल
जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारी क्षेत्राला कुठेतरी पोलिसांच्या मदतीची किनार असल्याचे सर्वत्र बोलल्या जाते. जिल्ह्यातील बहुतांश चर्चेतील खुनांच्या घटनांमधील आरोपी निर्दोष सुटले असून, मोकाट फिरत आहे. यात कुठेतरी तपास यंत्रणांनी सक्षमपणे काम केले नसल्याचे बोलल्या जात आहे. असा प्रकार घडू नये म्हणून दत्तक केसेस देण्यात आल्या असून, ह्यात आरोपीला कठोर शिक्षा झाल्यास पोलिसांचा प्रतीमा नक्कीच उंचावल्या जाण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.