आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासतत या ना त्या कारणाने चर्चेत राहिलेल्या मेहकर शहरातील रस्त्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. दरम्यान, पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे शहराच्या मध्य भागांमधून गेलेल्या पालखी मार्गाच्या रस्त्याच्या कडा मुरुमाने भरण्याची गजर आहे. अन्यथा तसे न झाल्यास शहराला पावसाळ्यामध्ये तलावाचे स्वरूप प्राप्त होणार असून परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. भविष्यातील धोका लक्षात घेता संबधित विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. मेहकर शहरातून रस्ते विकास महामंडळा अंतर्गत येणारा खंडाळा बायपास ते लोणार फाट्यापर्यंत मुख्य मार्ग गेला आहे. सदर महामार्ग हा सिमेंटचा बनवण्यात आलेला असून या महामार्गाचे काम हे देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. दरम्यान, या बाबतच्या अनेक तक्रारी विविध राजकीय पक्ष व सामाजीक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. परंतु गत पाच वर्षाच्या काळामध्ये निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कोणत्याच प्रकारची ठोस दंडात्मक कारवाई संबंधित अधिकाऱ्यांनी केली नसल्यामुळे पाच वर्षापासून कामात अनियमितता दिसून येते. त्यामुळे या महामार्गावर अनेक अपघात मागील काळात झाले असून अजूनही अपघाताची मालिका सुरूच आहे. त्यामध्ये अनेकांना अपंगत्व काहींना कायमचे अपंगत्व तर काहींचा यामध्ये मृत्यू देखील झाला आहे. असे असताना देखील कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाने अद्यापही संबंधित ठेकेदार कुठलीच कारवाई केली नाही. सदर रस्त्याचे काम हे जागोजागी निकृष्ट दर्जाचे झाले असताना सुध्दा ते ही काम दर्जेदार करून घेतले नाही. सदर महामार्गाच्या कडा यापूर्वी मुरुमाने भरलेल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी सिमेंट व गिट्टी टाकायची आहे असे आश्वासन देऊन संबंधित ठेकेदारांच्या कामगारांनी रस्त्यालगतच्या मुरून जेसीबीच्या साह्याने काढून घेतला. त्यामुळे रस्त्याची कडा व बांधलेली सिमेंटची नाली यामधील जवळपास दहा फुटाचे अंतरामध्ये दोन फुटाचे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचले तर मेहकर शहराला तलावाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सदर रस्त्याच्या कडा मुरमा च्या साह्याने भराव्यात जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना व वाहनधारकांना तसेच स्थानिक रहिवाशांना पावसाच्या पाण्याचा त्रास होणार नाही.अन्यथा असे न झाल्यास शहराला तलावाचे स्वरूप प्राप्त होऊन मोठ्या अडचणी भविष्यात निर्माण होऊ शकतात. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबधित ठेकेदाराला रस्त्याच्या कडा भरण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.