आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्यासंदर्भात कारवाई सुरू केली आहे. त्यात नगर पालिकांचा रखडलेला प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम आणि ग्रामपंचायतींच्या रखडलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमासह सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एकाचवेळी नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सुरू झाल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झालेली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील १० नगरपालिकांपैकी यवतमाळ, वणी, घाटंजी, आर्णी, उमरखेड, पुसद, दारव्हा आणि दिग्रस या ८ नगर पालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्या नगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. या निवडणुकीसंदर्भात सर्व आठ नगर पालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होवून त्यावर कारवाई सुरू झाली होती. या कार्यक्रमात प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप आणि हरकती बोलावण्यात आल्या होत्या. मात्र त्याचवेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय बैठक होवून आरक्षणाचा निर्णय होईस्तोवर निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव अधिवेशनामध्ये घेण्यात आला होता. त्यामुळे नगर पालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. मात्र आता त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावरुन राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून सर्व ८ नगर पालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा रखडलेला कार्यक्रम प्रभाग रचनेवर आक्षेप, हरकती बोलावण्यापासुन पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
त्यात येत्या ७ जून रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. हा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्व आठ नगरपालिकांमध्ये निवडणुकीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आटोपल्या आहेत. त्यात शिल्लक राहिलेल्या आणि जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू झाला होता. मात्र प्रभाग रचना झाल्यावर त्यावर आक्षेप, हरकती मागवण्यापासून कार्यक्रम रखडला होता. आता हा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. तयार झालेले प्रभाग रचनेचे प्रारूप उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. आता त्यावर आलेले आक्षेप आणि हरकती यावर उपविभागीय स्तरावर सुनावणी होवून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. ग्रामपंचातींच्या निवडणुकीसाठी हा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने जिल्ह्यात ग्रामीण भागात देखील निवडणुकांचा धुराळा उडणार असल्याचे दिसते.
एकंदरीतच प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुर्ण होवून नगर पालिका आणि ग्रामपंचायतींच्या अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच काही दिवसातच त्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात निवडणुकांचा भोंगा वाजला असल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकिय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.